महाराष्ट्र (मुंबई) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा राज्याचे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची युती शक्य नसल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या संघटनेत इतरांनी येऊ नये असते वाटते. दरवेळी त्यांचा इगो आड येतो.
राज ठाकरे यांनी एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्र व मराठी माणसांच्या भल्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याचे संकेत दिले होते. कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातील वाद व आमच्यातील भांडणे हे अत्यंत किरकोळ आहेत. महाराष्ट्र व मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे, वाद व इतर गोष्टी फार क्षुल्लक आहेत, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर मनसे व ठाकरे गट एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही आपली आपसातील वाद बाजूला ठेवण्याची तयारी असल्याचे स्पष्ट करत राज यांच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी उपरोक्त मत व्यक्त केले आहे.
उद्धव ठाकरे यांचा इगो दरवेळी आडवा येतो
संजय शिरसाट पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या संघटनेमध्ये इतरांनी येऊ नये असे वाटते. हा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. महाविकास आघाडीसोबत काय झाले? युती केली. शरद पवारांसोबत त्यांचे कधी जमले का? नाही. काँग्रेससोबत कधी जमले का? नाही. त्यामुळे त्यांचे राज ठाकरे यांच्यासोबत केव्हाच जमणार नाही. कारण राज यांना सर्वच अंतर्गत गोष्टींची जाणिव आहे. त्यामुळे राज यांच्यासोबत युती करण्यास उद्धव ठाकरे तयारी होतील असे मला तरी वाटत नाही.
उद्धव ठाकरे यांचा इगो दरवेळी आडवा येतो. त्यामुळे त्या या कुटुंबाचे विभक्तीकरण झाले आहे. राज ठाकरे यांना कधीही पक्ष सोडायचा नव्हता. त्यांनी कधीही पक्ष सोडण्याची भाषा केली नव्हती. उद्धव ठाकरे यांच्याकडे इगो होता. याला कंटाळूनच राज ठाकरे यांना वेगळे व्हावे लागले. जातानाही त्यांनी बाळासाहेबांना विश्वासात घेतले होते. जाताना मला त्रास होत आहे, पण मी काय करू. आता माझ्याकडे वेगळे होण्याशिवाय पर्याय नाही. असे बाळासाहेबांना सांगून राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली होती, असे संजय शिरसाट म्हणाले.
आता पाहू काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे म्हणाले होते, ‘प्रश्न असा आहे की, कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातील वाद आमच्यातील भांडणे हे अत्यंत किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे, वाद व इतर गोष्टी फार क्षुल्लक आहेत. अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणे व एकत्र राहणे यात फार काही कठीण गोष्ट आहे असे मला वाटत नाही. पण प्रश्न फक्त इच्छेचा आहे. हा माझ्या काही एकट्याच्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. मला वाटते आपण महाराष्ट्राचा लार्जर पिक्चर पाहिला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांमधील मराठी लोकांनी एकत्र येऊन एक पक्ष स्थापन केले पाहिजे असे मला वाटते.’ वाचा सविस्तर
उद्धव ठाकरेंनी काय दिला प्रतिसाद?
राज यांच्या या मैत्रिच्या प्रस्तावाला सशर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितासाठी माझीसुद्धा आपसातील किरकोळ वाद बाजूला ठेवण्याची तयारी आहे. पण महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कुणी येईल त्याचे स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलावणार नाही, मी त्याच्या घरी जाणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, हे पहिल्यांदा ठरवा. त्यानंतर महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यात माझ्याकडून कोणतीही भांडणे नव्हतीच. होती, तर मी आजच ती मिटवून टाकली. चला हे ठरवा, असे ते म्हणाले. सौ.दिव्यमराठी.






























