राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिके हातात येण्याच्या अंतिम टप्प्यावर असताना निसर्गाने शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. आज पुन्हा
?
जळगाव जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपले. यावल, चोपडा, जळगाव तालुक्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, कांदा, मका, केळी व इतर पिकांसह फळबागांनाही गारपीट आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. सकाळी कडाक्याचे ऊन पडलेले असताना, दुपारच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
पुण्यात जुन्नर तालुक्याला पावसाचा तडाखा
दुसरीकडे, पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातही दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांनी पावसाची हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची फळबागेची मोठी हानी झाली आहे. मात्र, या पावसामुळे उन्हाच्या कडाक्यापासून नागरिकांना दिलासाही मिळाला आहे.
गोंदियात प्रशासन सतर्क
गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळपासून वादळी वारे वाहत होते. वातावरणात गारवा जाणवत असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हवामान विभागाने गोंदिया जिल्ह्याला जोरदार वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी अश्रय घ्यावा, महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.
राज्यातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने राज्यातील विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देत आज 13 एप्रिल रोजी 11 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला होता. यामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली तसेच मराठवाड्यातील लातूर धाराशिव व मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. तसेच अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा देखील इशारा देण्यात आला.































