केंद्र शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या जलजीवन मिशन योजनेतून भंडारा जिल्ह्यात अनेक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचा गाजावाजा करण्यात आला. मात्र जल जीवन मिशन योजना, भंडारा जिल्ह्यात विविध समस्यांनी ग्रासली आहे. आत्तापर्यंत मंजूर 692 कामांपैकी केवळ 38
?
दरम्यान, योजनेचे एखादे काम बुहतांशी पूर्ण झाले आहे आणि एका किरकोळ मुद्द्यासाठी ते काम अडले असेल, तर त्याचे वर्णन सर्रास ‘हत्ती गेला अन् शेपूट राहिले’ असे केले जाते. जिल्ह्यातील जल जीवन पाणी योजनेचे असेच काहीसे झाले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेची कामे 2019 पासून सुरू झालेली आहेत; परंतु दोन वर्षे कोरोनामुळे कामे बंद होती. आता मुदत संपली तरी कामे पूर्ण झालेली नाहीत.
देशमुख साहेब…विचारले काय? आपण सांगितले काय?
भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषदेअंतर्गत जलजीवन ही योजना राबविली जात आहे. मराठी पत्रकार संघाचे सचिव मिलिंद हळवे यांनी 4 मार्च 2025 रोजी कार्यकारी अभियंता व्ही. एम. देशमुख यांना दिलेल्या लेखीपत्राद्वारे 12 प्रश्न विचारले होते. मात्र 12 पैकी एकाच प्रश्नाचे सविस्तर उत्तर कार्यकारी अभियंता देशमुख यांनी दिले असल्याचे मराठी पत्रकार संघाचे सचिव हळवे यांनी सांगितले.
सचिव हळवे म्हणाले की, कार्यकारी अभियंता देशमुख यांनी या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सात तालुक्यात एकूण 692 योजना प्रस्तावित असून, योजनांसाठी 275 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी 381 गावात योजनांची कामे ‘भौतिकदृष्टया’ पूर्ण झालेली असून ३८ गावांमध्ये ५० टक्के कामे पूर्ण झाले आहे. उपरोक्त 381 योजनांपैकी 264 योजना ग्रामपंचायतस्तरावरील असून त्या ग्रामपंचायतीमार्फत पूर्ण करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती दिली. परंतु उर्वरित ११ प्रश्नांची उत्तरे मात्र ते लेखी स्वरुपात देवू शकले नाही, असे हळवे यांनी सांगितले. तसेच या विचारलेल्या प्रश्नांबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही अंधारात ठेवले असल्याचा आरोप हळवे यांनी केला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या ५२ सभासदांपैकी एकाही सभासदाला जलजीवन योजनेबाबत चाललेल्या कामांचा पाठपुरावा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना करावा असा का वाटला नाही? असा प्रश्नही हळवे यांनी उपस्थित केला आहे. जलजीवन योजना म्हणजे जिल्ह्यात ‘आंधळा दळतो अन् कुत्र पीठ खाते’ असा काहीसा प्रकार असल्याचेही ते म्हणाले.
का आहेत योजना अपयशी?
एकाच ठेकेदाराने घेतलेली अनेक कामे, उपठेकेदाराची नेमणूक, केवळ दिखाव्यापुरती नळ जोडणी, झालेल्या खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी काम, निकृष्ट साहित्याचा वापर, वीज जोडणीबाबत समस्या अशी काही कारणे सांगितली जात असताना, त्यात ठेकेदारांना मागच्या एक वर्षापासून निधी मिळत नसल्याचे बोलले जात आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत जिल्ह्यातील आजची स्थिती अत्यंत विदारक आहे. महिलांच्या डोईवर असलेला हंडा हटलेला नाही. सरकारचे कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. परंतु, दारात पाणी आले नाही. योजना मंजूर आहे, म्हणून टँकर मंजूर होत नाही. यात नागरिकांची मात्र होरपळ होत आहे.
पेटी कंत्राटदाराला काम करण्याची मूक संमती?
जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पालांदूर (चौ.) गावात 2023 पासून जलजीवन मिशनचे काम सुरू असून अजून काम अपूर्ण आहे. सदर काम हे अरविंद कन्स्ट्रक्शन भंडारा यांच्याकडे असून पेटी कॉन्ट्रॅक्टर म्हणून संजय डहारे यांनी हे काम कमिशनवर घेतले असल्याची कबुली दिली. याला पालांदूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे, जेव्हा जेव्हा जलजीवन योजनेबाबतीत अडचणी आल्या, तेव्हा तेव्हा जलजीवन मिशन योजनेच्या अधिकाऱ्यांनी पालांदूर ग्रामपंचायतीच्या सभागृहात ग्रामपंचायत पदाधिकारी व पेटी कॉन्ट्रॅक्टर संजय डहारे यांच्यासोबत बैठक घेतल्याचा प्रकारही समोर आला आहे. एकंदरीत कंत्राट एकाला व काम करणारा दुसराच त्यामुळे जलजीवन मिशन राबविणाऱ्या अधिकाऱ्यांनी पेटी कंत्राटदाराला काम करण्याची मुक संमती तर दिली नाही ना? असा प्रश्न गावासह जिल्ह्यात विचारला जाऊ लागला आहे.
पेटी कंत्राटदाराबाबत कार्यकारी अभियंता अनभिज्ञ?
कार्यकारी अभियंता व्ही. एम. देशमुख यांना जलजीवन योजनेबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी रविवार दि. ११ मे रोजी दुपारी ३:०८ मिनीटांनी व्हाईस कॉल केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. नंतर ३:१२ मिनिटांनी पुन्हा व्हाईस कॉल केला तरीही उचलला नाही. मग ३:२८ मिनिटांनी व्हॉटस्अॅपवर मॅसेज पाठविल्यावर ३:४४ वाजता दरम्यान कार्यकारी अभियंता यांनी मिलिंद हळवे यांना कॉल केला. तेव्हा हळवे यांनी जलजीवन योजनेअंतर्गत ग्रामीण भागात चाललेल्या कामाचे कंत्राट मुख्य कंत्राटदार काम करतात का? की पेटी कंत्राटदार कामे करीत आहेत? असा प्रश्न विचारले असता कार्यकारी अभियंता देशमुख यांनी कुठल्या भागाची तक्रार आहे ते सांगा त्यानंतर मी आपणास माहिती देतो. वास्तविक पाहता मुख्य ठेकेदारच काम करीत आहे, असे त्यांच्या बोलण्यात दिसून आले. मुख्यत: बर्याच वर्षापासून या जलजीवन योजनेचे कामे ग्रामीण भागासह शहरी भागात चालू आहे. परंतु देशमुखांना हे काम मुख्य कंत्राटदार करतो की पेटी कंत्राटदार करतो हे त्या क्षणी समजले नसावे.
































