पुणे : गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणात पुण्याचं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडलं होतं. तर डॉक्टर सुश्रूत घैसास यांनी या प्रकरणात राजीनामा दिला होता. तनिषा भिसे प्रकरणात ससून रुग्णालयाचा चौकशी अहवालातून रुग्णालय आणि डॉक्टरला क्लीन चिट देण्यात आली आहे.
रुग्णालय आणि डॉ घैसास यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोरदार सुरू होती. मात्र आता मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर घैसास यांना दिलासा मिळालाय.ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीनं 6 पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर केलाय. यामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांना क्लीन चिट मिळालीय तर मंगेशकर रुग्णालयावरही ठपका ठेवलेला नाही. त्यामुळे ससून रुग्णालयाच्या अवहालानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाच्या समितीने दिलेला अहवाल अर्धवट असल्याचं वक्तव्य भाजप आमदार अमित गोरखे यांनी केलंय. पूर्ण अहवाल येईल तेव्हा नक्कीच दोषींवर गुन्हे दाखल होतील असा विश्वास गोरखे यांनी व्यक्त केलाय.
दीनानाथ रुग्णालयाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी म्हटलंय. तर ससूनच्या अहवालासह आतापर्यंत आलेल्या तीनही अहवालांनुसार दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलंय.
तनिषा भिसे मृत्यू प्रकरमातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून करण्यात येतेय. पुण्यात याबाबत अनेक आंदोलनंही झाली. मात्र ससूनच्या अहवालात मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर घैसास यांना क्लिनचीट दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. मग तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दोषी कोण असाही सवाल विचारला जात आहे.सौ.झी.न्यूज.




























