माभाता तथ्ये: महाभारत… या शब्दाचा उल्लेख केल्यानंतर लगेचच डोळ्यांसमोर कौरव आणि पांडवांमध्ये कुरूक्षेत्रावर लढल्या गेलेल्या भयंकर युद्धाचं पुराणकथांमधील चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. अशा या महाभारत युद्धासंदर्भात आजही कैक प्रश्न सातत्यानं उपस्थित करण्यात येतात. महाभारत युद्धाचा शेवट नेमका कसा झाला इथपासून युद्धात विजयी ठरलेल्या पांडवांचं पुढे काय झालं हे सांगणारे अनेक सिद्धांतसुद्धा समोर आले. याच महाभारताशी थेट संबंध असणाऱ्या पांडवांच्या वंशजांविषयीची माहिती काहीशी थक्क करणारी आहे.
आजही आहे पांडवांच्या वंशजांचं अस्तित्वं…
मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यामध्ये असणाऱ्या एका समुदायाकडून अंगावर काटा आणल्या जाणाऱ्या प्रथेचं पालन केलं जातं. ही प्रथा अशी की, या गावातील नागरिक काट्यांच्या शय्येवर निजतात. पूर्वापार चालणारी परंपरा सुरू ठेवण्यासाठी म्हणून या समुदायाचे नागरिक या शय्येवर निजून वेदना सहन करतात, त्यावर लोळतात.
बैतूलमधील सेहरा गावातील ही कथा असून, इथं वास्तव्यास असणारा समुदाय स्वत:ला पांडवांचे वंशज म्हणवतो. या समुदायाचं नाव आहे, रज्झड समुदाय. दरवर्षी या समुदायातील मंडळी काट्यांची एक विशिष्ट शैय्या तयार करून त्या माध्यमातून स्वत:ला प्रचंड यातना देतात.
काय आहे इतक्या वेदना सहन करण्यामागचं कारण?
बोराच्या काटेरी फांद्यांच्या मदतीनं हा समुदाय एक शैय्या तयार करतो आणि त्यावर चक्क नाचतात, निजतात, लोळतात. महाभारत काळापासूनच ही प्रथा इथं सुरू असून, त्यामागं एक दंतकथासुद्धा सांगितली जाते. असं म्हणतात की, एकदा पांडव वनातून जात असताना तहान-भुकेनं व्याकूळ झाले आणि याचदरम्यान नाहल समुदायाच्या काही माणसांनी पांडवांपुढे एक अट ठेवली. जर त्यांच्या मानलेल्या बहिणीशी लग्न लावून दिलं, तरच त्यांना पिण्यासाठी पाणी दिलं जाईल, हीच ती अट.
पांडवांनीही नाहल समुदायाची ही अट स्वीकारली आणि नाहल समुदायातील त्या व्यक्तीचं लग्न आपल्या भोंडई या मानलेल्या बहिणीशी ठरवलं. नाहल इसमास पांडवांच्या या शब्दावर विश्वास नसल्यामुळं अखेर पांडवांनीच काट्यांच्या शय्येवर निजत आपली सत्यता सिद्ध केली. याच प्रसंगाला दरवर्षी पुनरुज्जीवित करण्यासाठी म्हणून रज्झड समुदाय इथं स्वत:ला पांडवांचे वंशज म्हणवत या प्रथेचं पालन करत या प्रथेचं पालही करतो.































