मुळशी (खारावडे) : खारावडे येथील श्री म्हसोबा देवस्थानाच्या गाभाऱ्यात तब्बल ६२ किलो चांदीची महिरप बसविण्यात आली आहे. ही महिरप भक्त संतोष भाडळे यांच्या श्रध्देचा आणि भक्तीचा एक अद्वितीय नमुना ठरत आहे.
या महिरपेचे विधीवत पूजन व अर्पण कोल्हापूर येथील करवीर पीठाचे श्री जगद्गुरु शंकराचार्य विद्यानृसिंहभारती आणि भाऊ महाराज परांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
देवस्थानच्या अध्यक्षा सौ. मधुरा भेलके यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसोबा देवस्थानला नुकताच ‘ब’ दर्जाचा तीर्थस्थळ म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे ट्रस्टकडून मंदिर परिसराचे सुशोभीकरण तसेच भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दररोज येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय वाढत असून, देवतेसाठी चढविण्यात येणाऱ्या दानातही विविधता आढळून येते. काही भाविक रोख रक्कम अर्पण करतात, तर काहीजन सोनं, चांदी, मौल्यवान दागदागिने देतात.
संतोष भाडळे यांनी अर्पण केलेली ही चांदीची महिरप भाविकांमध्ये आकर्षणाचे केंद्र ठरत असून, श्रद्धेचा एक अनोखा सोहळा म्हणून ती पाहिली जात आहे.

































