२५ व २६ एप्रिल रोजी दोन दिवसीय बीज संमेलनाचे आयोजन
पुणे : “एकतरी झाड लावूया, चला सावली पेरूया” या बोधवाक्याने निसर्गप्रेमींच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या सह्याद्री देवराई आणि भारती विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिले दोन दिवसीय बीज संमेलन पुण्यात भरविण्यात येणार आहे. हे संमेलन दि. २५ आणि २६ एप्रिल २०२५ रोजी धनकवडी येथील भारती विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाची माहिती सह्याद्री देवराईचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहकार्यवाह डॉ. के.डी. जाधव व विचारभारतीचे संपादक प्रा. मिलिंद जोशी उपस्थित होते.
बीज संकलनाचे शास्त्रीय प्रशिक्षण
दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत ताम्हिणी घाटात सह्याद्री देवराईचे दहा तज्ञ सदस्य, भारती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांना बीज संकलनाचे शास्त्रीय प्रशिक्षण देतील. प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी पुढे विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करणार असून संपूर्ण राज्यातून बिया संकलित करण्यात येणार आहेत.
‘हरित संपत्ती’चे प्रदर्शन आणि चर्चासत्र
सकाळी ११ वाजता ‘हरित संपत्ती’ या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. अस्मिता जगताप यांच्या हस्ते होणार असून पर्यावरण तज्ज्ञ एस. आर. यादव व उपवन संरक्षक महादेव मोहिते यांची उपस्थिती लाभणार आहे.
प्रदर्शनात देवराईची प्रतिकृती, विविध बियांचे आणि पानांचे प्रदर्शन, कंदांचे नमुने, पाणवठ्याची प्रतिकृती, पालखीमधील वृक्षदिंडी तसेच जुन्या कपड्यांपासून तयार केलेल्या उपयोगी पिशव्या यांचे सादरीकरण होणार आहे.
सायंकाळी ६ ते ९ या वेळेत पर्यावरण विशेष चर्चासत्र होणार असून ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. इरीच भरुचा अध्यक्षस्थानी असतील. या सत्रात संजय पाटील, डॉ. मंदार दातार, डॉ. अपर्णा वाटवे, सुहास वैंगणकर यांच्यासह इतर मान्यवर तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
बीजमातेचा गौरव आणि बीजतुला सोहळा
दि. २६ एप्रिल रोजी देशी बियांचे जतन करणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रीय गायक आचार्य पं. मुकुल शिवपुत्र यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून एक लाख रुपये व सन्मानपत्र असे त्याचे स्वरूप आहे.
विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या बियांतून तयार होणाऱ्या रोपांचे बीजतुला कार्यक्रम शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम यांच्या उपस्थितीत होणार असून त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. ही रोपे विद्यापीठाच्या परिसरात लावली जातील व त्यांची देखभाल विद्यार्थी करणार आहेत.
निसर्गप्रेमाची गोडी आणि सर्जनशील उपक्रम
या संमेलनात लहान मुलं आणि युवकांना झाडांची गोडी लागावी यासाठी विशेष गाणी तयार करण्यात आली असून त्यांचे लोकार्पण व सादरीकरण होणार आहे. सह्याद्री देवराईने केलेल्या कार्याची चित्रफीत दाखवण्यात येईल तसेच पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार आणि मार्गदर्शन यांनाही संमेलनात महत्त्वाचे स्थान दिले जाणार आहे.
सयाजी शिंदे म्हणाले, “बीज संमेलनाचा उद्देश भाषणापुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवण्यावर आहे. झाडं, बीया आणि निसर्ग यांची ओळख करून देऊन त्यांच्यावर प्रेम करायला लावणं हेच आमचं ध्येय आहे.”

































