व्हायरल पोस्ट: मुंबईतल्या एका स्टार्टअप कंपनीने एका उमेदवाराला भरघोस पगारावर नोकरी देण्याचा निर्णय घेतला होता. मुलाखतीत उमेदवाराने छाप पाडली होती आणि कंपनीने आपला बजेटही वाढवलं होतं. पण अंतिम टप्प्यावर एक गोष्ट अशी उघडकीस आली, की सगळं चित्रच बदलून गेलं आणि उमेदवाराच्या हाती आलेली नोकरी गेली. हे असं कसं झालं याबद्दल चला जाणून घेऊयात.
डिजिटल युगात सोशल मीडियावरील तुमची उपस्थिती जितकी प्रभावी ठरू शकते, तितकीच ती धोकेदायकही ठरू शकते. याचं ताजं उदाहरण नुकतंच समोर आलं आहे, ज्यामुळे नोकरीच्या जगात मोठा गदारोळ झाला आहे.
नक्की काय झालं?
Jobbie नावाच्या स्टार्टअपने एक उमेदवार निवडला होता. कंपनीचे संस्थापक मोहम्मद अहमद भाटी यांनी ही घटना स्वतः त्यांच्या लिंक्डइन पोस्टमधून शेअर केली. त्यांनी लिहिलं, ‘तो उमेदवार खूप टॅलेंटेड होता. त्याने केवळ आमच्या वेबसाईटवर आपलं सीव्ही तयार केलं नव्हतं, तर आमच्या प्रॉडक्टबाबत उपयुक्त सूचनाही दिल्या होत्या. मात्र, जेव्हा कंपनीने नेहमीप्रमाणे उमेदवाराचा बॅकग्राऊंड चेक केला, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. त्या उमेदवाराने अलीकडेच सोशल मीडियावर धार्मिक समुदायांबाबत द्वेषपूर्ण टिप्पणी केली होती.’
भाटी पुढे म्हणाले, ‘टॅलेंट तुम्हाला मुलाखतीत पुढे नेऊ शकतं, पण तुमचं वर्तन आणि विचार ठरवतात की तुम्ही कंपनीत किती काळ टिकाल. आमच्यासाठी कौशल्याइतकंच माणुसकी आणि परस्पर सन्मान महत्त्वाचे आहेत.’
सोशल मीडियावर दोन गट पडले
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स दोन भागांत विभागले गेले. एका बाजूला अनेकांनी भाटी यांच्या निर्णयाचं कौतुक केलं, “कंपनीने आपल्या मूल्यांवर ठाम राहिलं आणि योग्य गोष्ट केली.” असं म्हणत त्यांनी पाठिंबा दिला. पण दुसरीकडे काही यूजर्सनी याला “फक्त पब्लिसिटी स्टंट” म्हटलं. काहींनी विचारलं की “जर हे इतकं महत्त्वाचं होतं, तर इंटरव्ह्यूपूर्वीच बॅकग्राऊंड चेक का केला नाही?” तर काहींनी याला “वर्कप्लेसवरील कॅन्सल कल्चरचं टोकाचं उदाहरण” म्हणत तीव्र टीका केली.































