मुंबई-बंगलुरू महामार्ग: मुंबईतून बंगळुरूला जाण्यासाठी नव्याने महामार्ग बांधण्यात येत आहे. मुंबईतील अटल सेतूपासून बंगळुरूला जाणारा हा 14 पदरी द्रुतगती महामार्ग पुणे रिंगरोडला जोडला जाणार आहे. या महामार्गामुळं मुंबई-पुणे प्रवासही सोप्पा होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाची घोषणा केली होती.
मुंबई ते बंगळुरू रस्तेमार्गे जाण्यासाठी 18 तासांचा वेळ लागतो मात्र या महामार्गामुळं 6 तासांत पूर्ण होणार आहे. या महामार्गासाठी 40 हजार कोटींचा खर्च येणार असून नागरिकांसाठी एक गेमचेंजर ठरणार आहे. हा नवीन एक्स्प्रेस वे जवळपास 700 किमी लांबीचा आहे. हा पूर्णपणे ग्रीनफिल्ड आणि हायस्पीड असणार आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कर्नाटकातील 9 जिल्ह्यांना जोडणार आहे. त्यामध्ये बंगळुरू ग्रामीण, बेलगावी, बागलकोट, गदग, कोप्पल, विजयनगर (बल्लारी), दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमाकुरू या जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे. यामुळं मल्टी सिटी कनेक्शन वाढणार आहे.
तीन मेट्रो शहरांना जोडणारा हा रस्ता लॉजिस्टिक्स, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला चालना देणार आहे. या प्रकल्प NHAI भारतमाला योजनेंतर्गंत हाती घेण्यात आला आहे. या एक्स्प्रेसमध्ये 55 फ्लायओव्हर, 22 इंटरचेंज आणि 2 इमरजन्सी एयरस्ट्रिप्स असणार आहेत. म्हणजे सुरक्षा आणि गती दोन्ही मिळणार आहे. फक्त मुंबईतूनच नाही तर सातारा आणि कोल्हापूर व्यतिरिक्त गुजरात, नाशिक आणि पुण्यातून प्रवास करणाऱ्यांसाठीही हा महामार्ग फायदेशीर ठरणार आहे.
रिपोर्टनुसार, एक्स्प्रेसवे पुण्याच्या रिंग रोडवरुन बेंगळुरुच्या सॅटेलाइट रिंग रोडवर मुथागदहल्लीपर्यंत जाईल. एक्स्प्रेस वेमुळं या जिल्हातील व्यापाराला गती मिळणार आहे. या मार्गावर 55 फ्लायओव्हर असणार आहेत. त्याचबरोबर मुंबई/पुणे-बेंगळुरू एक्स्प्रेसवेचे जवळपास 10 नद्या असणार आहेत. येरला, नीरा, चांद नदी, कृष्णा, अग्रनी, घाटप्रभा, तुंगभद्रा, मालाप्रभा, चिक्का, वेदवथ या नद्या पार करणार आहे. त्यामुळं नागरिकांना निसर्गाच्या साथीने प्रवास करता येणार आहे.
प्रस्तावित मुंबई-पुणे-बंगळुरु एक्सप्रेस वेमुळे या तीन शहरांमधील प्रवासाचं अंतर 95 किलोमीटरनं कमी होणार आहे. या एक्सप्रेसवेमुळे पुण्या-मुंबईहून बंगळुरुला पोहोचायला केवळ सात तासांचा अवधी लागणार आहे. सध्या मुंबई बंगळुरुला जाण्यासाठी 18 तासांचा वेळ लागतो. 2028 मध्ये एक्सप्रेसवे लोकांसाठी खुला होण्याची अपेक्षा असल्याची माहिती समोर येत आहे.































