मुळशी (महाळुंगे) : माण-हिंजवडी ते शिवाजी महाराजनगर दरम्यान उभारण्यात येत असलेल्या मेट्रो मार्गावरील स्टेशन क्रमांक १० हे महाळुंगे गावाच्या हद्दीत असूनही या स्टेशनच्या नावात वारंवार अन्यायकारक व चुकीचा उल्लेख केला जात आहे. या विरोधात ग्रामस्थांनी आवाज उठवत, स्टेशनला ‘महाळुंगे मेट्रो स्टेशन’ असे नामकरण करण्यात यावे, अशी जोरदार मागणी केली.
ग्रामस्थांच्या पुढाकाराने आणि ‘म्हाळुंगे क्रिडानगरी’च्या वतीने स्टेशन क्रमांक १० च्या ठिकाणी ‘महाळुंगे मेट्रो स्टेशन’ असे नाव असलेले फलक लावण्यात आले आणि अनावरण करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील शांताराम पाडाळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक संतोषदादा मोहोळ, सरपंच मयूर भांडे, माजी उपसरपंच काळुराम गायवाड, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पाडाळे, माजी उपसरपंच युवराज कोळेकर यांच्यासह तुषार हगवणे, रणजित पाडाळे, पांडुरंग पाडाळे, ज्ञानेश्वर पाडाळे, रितेश पाडाळे, अभि शेडगे, दत्ता मेटकरी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी यावेळी सांगितले की, “मेट्रो स्टेशन क्रमांक १० पूर्णतः महाळुंगे गावाच्या हद्दीत आहे. तरीही या स्टेशनच्या नावात गावाचे नाव न घेता इतर भागांचा उल्लेख केला जात आहे. ही बाब ग्रामस्थांच्या भावना दुखावणारी आहे. मेट्रो प्रशासनाने ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन ‘महाळुंगे मेट्रो स्टेशन’ असे अधिकृत नामकरण तातडीने करावे.”
या निमित्ताने गावकऱ्यांनी एकजूट दाखवत गावाच्या अस्मितेसाठी ठाम भूमिका घेतली. यामुळे महाळुंगे गावात मेट्रो स्टेशनच्या नावाबाबत जनजागृती वाढली असून, प्रशासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



































