नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरातील कोसे ले-आऊट परिसरात अमेय भास्कर बसेशंकर यांच्या घराच्या छतावर आकाशातून एक जड धातूचा तुकडा कोसळला. यामुळे छतावरील पॅराफिट वाॅलचा काही भाग तुटला. भिंतीला किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र,
?
स्थानिकांनी सांगितले की, मोठा आवाज झाल्यानंतर आकाशातून काहीतरी भारी वस्तू खाली पडल्याचा अनुभव आला. नंतर तपासणी केल्यावर समजले की, अमेय भास्कर बसेशंकर यांच्या घराच्या स्लॅबवर एक मोठा लोखंडी तुकडा कोसळला आहे. हा तुकडा सुमारे ५० किलो वजनाचा, १० ते १२ मिमी जाडीचा आणि सुमारे ४ फूट लांबीचा आहे. हा तुकडा अर्धवट तुटलेल्या अवस्थेत असून, त्यामुळे घराचे छत आणि भिंतीला किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अमेय यांनी तात्काळ उमरेड पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी तपासणी केली. प्राथमिक तपासणीत या धातूच्या तुकड्यामध्ये कोणतीही स्फोटक सामग्री नसल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा तुकडा नागपूर फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
अवकाश कचऱ्याचा भाग उमरेडजवळ पडलेला धातूचा तुकडा हा अवकाश कचऱ्याचा भाग असून एखाद्या रॉकेटचा तुकडा असावा, असे खगोल अभ्यासक व स्काय वाॅच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसात दोन अवकाश मोहिमेच्या तुकड्यांचा वातावरणात प्रवेश झाला होता. त्यात २४ मार्च रोजी स्पेस एक्स क्रू-९ ड्रॅगन स्पेसक्रॉफट तसेच इसरोचे पोएम-४ एक्सपेरीमेंट मॉड्युल आणि पीएसएलव्ही रॉकेटचा समावेश होता. हे रॉकेट ४ एप्रिलला पडले होते. उमरेडजवळ पडलेला तुकडा इतरही रॉकेटचा असू शकतो. सविस्तर अभ्यास झाल्यानंतरच खरी स्थिती कळेल. इसरोच्या वैज्ञानिकांशी संपर्क साधला असता त्यांनी हे तुकडे रॉकेटचे असावे, असे चोपणे यांनी सांगितले.
हजारो तुकड्यांची सुरू आहे भटकंती
चंद्रपूर जिल्ह्यात २ एप्रिल २०२२ रोजी रात्री चीनच्या रॉकेटचे ५ तुकडे पडले होते आणि इस्रोच्या वैज्ञानिकांनी ते नेले होते. अलीकडे अवकाशात असे उपग्रहांचे हजारो तुकडे भटकंती करीत असून ते समुद्रात आणि जमिनीवर पडत असतात. त्यात क्वचित जीवितहानी होत असते. शासनाने नुकसान भरपाई दिली पाहिजे, असे चोपणे म्हणाले.
































