भारत विरुद्ध पाक : भारत विरुद्ध पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यात 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे टी 20 क्रिकेटमधील (T20 Cricket) ग्रुप स्टेजचा सामना रंगणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेलं असून या सामन्यासाठी क्रिकेट प्रेमी उत्साहित आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने भारताविरुद्ध होणाऱ्या या सामन्यावर बहिष्कार टाकल्याने हा सामान होणार की नाही यावर शंकेचे ढग होते, मात्र आयसीसी सोबत झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानने हा सामना खेळण्यास होकार दिलाय. श्रीलंकेतील कोलंबो येथे रविवारी भारत – पाकिस्तान सामना होणार असून हा सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहण्यासाठी क्रिकेट रसिक उत्साहित आहेत. त्यामुळे अनेकजण कोलंबोसाठी रवाना होत आहेत. मात्र यामुळे कोलंबोला जाणाऱ्या विमान प्रवासाचं तिकीट महागलं असून याची किंमत लाखांच्या घरात पोहोचलीये.
कोलंबोला जाणाऱ्या विमानाचं तिकीट लाखोंच्या घरात :
जर तुम्ही शेवटच्या क्षणी दिल्ली वरून कोलंबो येथे जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. दिल्लीहून कोलंबोला जाणाऱ्या विमानाचं राउंड ट्रिप तिकीट हे 90,000 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. तर मुंबईवरून जायचं असेल तर यासाठी प्रवाशांना तब्बल 70,000 रुपये खर्च करावे लागतील. तर चेन्नई किंवा कोची वरून कोलंबोला जाणाऱ्या तिकीटाची किंमत जवळपास 50,000 रुपये आहे. विशेषतज्ज्ञांचं म्हणणं आहे की 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या ही सामान्य दिवसांच्या तुलनेत 22 टक्क्यांनी वाढली आहे. कोलंबोच्या बुकिंगमध्ये सुमारे 65 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे, जी या सामन्याची लोकप्रियता दर्शवते.
हॉटेल सुद्धा हाऊसफुल्ल :
भारत – पाकिस्तान सामन्यामुळे फक्त विमानाचं तिकीट नाही तर कोलंबोमधून हॉटेलचे रेट सुद्धा वाढले आहेत. कोलंबो शहरातील प्रमुख आणि प्रीमियम हॉटेलच्या बुकिंगमध्ये 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. श्रीलंकेचा व्हिसा-मुक्त प्रवेश भारतीय पर्यटकांसाठी एक मोठा प्लस पॉइंट ठरत आहे, कारण लोक कोणत्याही लांब कागदपत्रांशिवाय अचानक सहलींचे नियोजन करतायत. ट्रॅव्हल एजन्सींच्या मते, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या प्रमुख शहरांमध्ये सर्वाधिक मागणी आहे. कोलंबोमधील राहण्याची जागा भरलेली असल्याने, चाहते आता गॅले आणि कॅंडी सारख्या जवळच्या शहरांमध्ये राहण्याचा पर्याय शोधत आहेत.
हेही वाचा : IND VS PAK : टीम इंडिया पाकिस्तानी खेळाडूंशी हॅन्डशेक करणार का? कॅप्टन सूर्यकुमारने स्पष्टच सांगितलं
कसा आहे भारत – पाकिस्तानचा हेड टू हेड रेकॉर्ड?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 13 टी 20 सामने खेळवण्यात आले. यापैकी 9 सामन्यात भारताने तर 3 सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवलाय. तर आतापर्यंत टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान हे संघ 8 वेळा आमने सामने आले तर यापैकी 7 वेळा भारताने पाकिस्तानवर तर एकदा पाकिस्तानने भारतावर विजय मिळवलाय.































