अजित पवार विमान अपघात: जानेवारी 2026 ची 28 तारीख ही महाराष्ट्रासाठी दु:खाचीच बातमी घेऊन आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचं वृत्त वाऱ्याच्या वेगानं पसरलं आणि पवार कुटुंबावर एक मोठा आघात झाला. परिस्थिती अतिशय आव्हानाची असतानाही पुन्हा एकदा सारं बळ एकवटून या कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं जीवनाचा गाडा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला, किंबहुना हे प्रयत्न अद्यापही सुरू आहेत. मात्र कुटुंबापुढं असणारं दु:ख अतिशय मोठं असून यावेळी आपण या कुटुंबाच्या सोबत आहोत अशीच भावना राज्यातील जनतेची आणि नाना पाटेकरांचीसुद्धा आहे.
नुकतंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर वृत्तसंस्थेशी संवाद साधताना नाना पाटेकर यांनी अजित पवार यांचं अपघाती निधन आणि त्यानंतरची एकंदर परिस्थिती यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ‘त्यांना भेटल्यानंतर एकच गोष्ट आहे की त्यांचं दु:ख आपल्याला वाटून घेता येणार नाही. आम्हालाही दु:ख झालं आहे. पण, त्यांचं जे दु:ख आहे ते डोंगराइतकं मोठं आहे आणि ते त्यांना सहन करावं लागेल. कारण, त्यांनी जो पदभार स्वीकारला आहे त्याचीही काही जबाबदारी असून ती निभावण्यासाठी त्या बांधिल आहेत आणि त्या निभावतील. वेळ तर जाईलच…’, नाना म्हणाले.
रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर आणि त्याच्या अपघाती निधनावर प्रश्न उपस्थित करण्यासंदर्भातील प्रश्नावरही नाना पाटेकर यांनी वक्तव्य केलं. ‘रोहित पवार यांचे ते काका होते, ते त्यांच्या कुटुंबातील आहेत, त्यांनी कुटुंबातील सदस्य म्हणून मनातील शंका ते बोलले असतील. मी ती ऐकली नसल्यानं त्यावर थेट प्रतिक्रिया देणार नाही. मात्र जर असं झालं असेल (घातपात) तर ते सिद्ध होईल सिद्ध झालं तर तर ज्यांनी हा घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न केला त्यांना शिक्षा होईल’, असं ठाम मत त्यांनी मांडलं.
#पाहा | मुंबई | महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल अभिनेते नाना पाटेकर म्हणतात, “आम्हाला (अजित पवार यांच्या निधनाने) दु:ख झाले आहे…. हे सर्व दोन पक्षांवर (राष्ट्रवादीच्या दोन गटांचे विलिनीकरण) अवलंबून आहे… मी त्यांना १९-२० वर्षांचा असल्यापासून ओळखत होतो आणि… pic.twitter.com/EIyWkbMMMA
— ANI (@ANI) १२ फेब्रुवारी २०२६
दरम्यान, दोन्ही एनसीपी विलीनीकरणाबाबतच्या प्रश्नावरही उत्तर देत निर्णय त्या दोन्ही पक्षांवर असेल, हे मला ठरवता आलं असतं तर मीच ठरवलं असतं, असं म्हणत अजित पवार आणि आपल्या मैत्रीचं नातंही त्यांनी माध्यमांसमोर आणलं. आपण अजित पवार हे 19-20 वर्षांचे असल्यापासून त्यांना ओळखतोय. त्यांनी कार्यकर्त्याच्या रुपात काम सुरू केलं तेव्हापासून त्यांना ओळखत असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘आता कोणीही व्यक्ती मोठा झाला तर आमची अशी मैत्री होती वगैरे बोलण्याची पद्धत आहे. पण, आज ती व्यक्तीच नाही, तर त्यांच्याविषयी बोलून उपयोग काय? मात्र त्यांची या क्षेत्रात जशी सुरुवात झाली होती आणि ते ज्या पद्धतीनं या पदापर्यंत पोहोचले हा प्रवासच कमाल होता. राजकीय गोष्टी सोडा मात्र, ते मला कायमच स्मरणात राहतील. मी एक सच्चा दोस्त गमावला आहे. माझ्या धाकट्य़ा भावासारखे होते’, असं सांगताना अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केले जात असतील तर त्यांची उत्तरं, शंकांचं निरसन झालंच पाहिजे आणि प्रश्न उपस्थित होतायत तर उत्तरही मिळतील याचाच पुनरुच्चार नाना पाटेकर यांनी केला.































