पंतप्रधान मोदी यूके भेट महाराष्ट्रावर परिणाम: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यातून काही महत्त्वाच्या मुद्द्यांसंदर्भातील माहिती समोर आली असून, त्याच्याशी थेट महाराष्ट्राचंही नातं जोडलं जात आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याशी मुलाखतीदरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये कैक मुद्द्यांवर चर्चा झाली. जिथं या दोन्ही नेत्यांनी भारत- ब्रिटनदरम्यान (युके) मुक्त व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्यावर एकमतानं पुढाकार घेतला. सोबतच दहशतवाद, कट्टरतावादाविरोधादत कठोर भूमिका घेण्याचाही संकल्प केला.
का चर्चेत आहे PM Modi यांची ब्रिटनभेट?
जवळपास मागील तीन वर्षांपासून ब्रिटनमध्ये राजकीय अस्थिरता पाहायला मिळाली आणि अखेर बहुप्रतिक्षित चर्चा आणि वाटाघाटींनंतर या दोन्ही देशांमध्ये ‘मुक्त व्यापार करार’ अस्तित्वात आल्याचं सांगण्यात आलं. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत पीयुष गोयल यांनी भारताच्या वतीनं आणि जोनाथन रेनॉल्ड यांनी ब्रिटनच्या वतीनं या जगभराचं लक्ष लागून राहिलेल्या करारावर स्वाक्षरी केली.
सोप्या शब्दात समजून घ्या या कराराचा कोणाला फायदा?
ब्रिटन आणि भारतादरम्यान झालेल्या या करारामुळं अनेक भारतीय उत्पादनांना ब्रिटनच्या बाजारपेठेत करमुक्त प्रवेश करणं शक्य होईल आणि ब्रिटनमधून भारतात येणारी चारचाकी वाहनं ते अगदी मद्यसुद्धा स्वस्त होईल. Economic and Trade Agreement अशा नावानं संबोधल्या जाणाऱ्या या करारामुळं मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होणार असून, भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांनध्ये एका नव्या इतिहासाची ही नांदी असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधानांच्या ब्रिटन दौऱ्यातील महत्त्वाचे मुद्दे आणि महाराष्ट्राशी असणारं नातं…
– भारतातून होणाऱ्या 99 टक्के निर्यातीला ब्रिटनमध्ये 100 टक्के व्यापार कर सवलत.
– भारतातून पादत्राणांचे प्रकार, वस्त्रोद्योग, हिरे, दागिने, मत्स्योत्पादन आदि वस्तूंना ब्रिटनच्या मोठ्या बाजारपेठेत वाव मिळणार.
– दुहेरी योगदान पद्धती अर्थात दोन्ही देशांचं समान आणि भरीव योगदान असल्यामुळं ब्रिटनसह भारतातील सेवा क्षेत्राला नवी उभारी मिळणार.
– भारतीय नोकरदारांना ब्रिटनमध्ये नोकरीच्या संधी
– ब्रिटनमधील जवळपासल 75 हजार भारतीयांना ‘सामाजिक सुरक्षा शुल्का’तून तीन वर्षांसाठी सूट
– आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा फायदा
– महाराष्ट्रातील कोकणचा हापूस आंबा बागायतदार, फणस उत्पादकांना फायदा
– नाशिकच्या द्राक्ष आणि कांदा उत्पादकांना फायदा
– कोल्हापूरी चप्पल कारागिरांनासुद्धा फायदा होणार, सोबतच राज्यातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगालाही या करारामुळं फायदा होणार असून, एका अर्थी ही महाराष्ट्राला लागलेली लॉटरी आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.
































