स्वाती नाईक (प्रतिनिधी) नवी मुंबई : नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील खराब झालेला भाजीपाला फेकण्यात आला होता. मात्र, तोच भाजीपाला पुन्हा उचलून त्याची विक्री करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. तुम्ही रस्त्यावर बसलेल्या भाजी विक्रेत्यांकडून स्वस्त दरात भाजी खरेदी करत असाल तर सावधान व्हा.
सध्या मान्सूनपूर्व पावसामुळे नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला सडत असल्याने फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. मात्र याच फेकलेल्या भाजीपाल्यातून भाजी वेचून ती रस्त्यावर विक्री करण्यासाठी काही जण भाजी घेऊन जातायत. फेकलेल्या भाजीपाल्यातून भाजी गोळा करताना एपीएमसी मार्केट परिसरात अनेक जण पहायला मिळत असून यांच्यावर कोणाचाही वचक राहिलेला दिसत नाहीये. सुरक्षा रक्षक देखील यांच्याकडे दुर्लक्ष करतायत. मुसळधार पावसामुळे भाजीपाला खराब झाला असून तो फेकून देण्याची वेळ येत आहे.
पावसामुळे दोन ते तीन गाड्या माल फेकून द्यावा लागत असल्याचं व्यापा-यांनी सांगितलंय. पाऊस जास्त असल्यामुळे भाजी खराब होते. तसंच ती जास्त दिवस टीकत नसल्यामुळे भाजी फेकून द्यावी लागते असं व्यापा-यांकडून सांगण्यात येतं आहे.
सडलेला भाजीपाला स्वस्त दरात मिळतो म्हणून आपण फुथपाथ वरून भाजी खरेदी करतो मात्र प्रत्यक्षात ही भाजी कुठून आणि कशी आणली आहे, याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे रस्त्यावरून स्वस्त दरात भाजी घेताना एकदा भाजी कशी आहे याची खातरजमा नक्की करा.































