मुंबई मधील धरण: मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी दोन धरणे बांधण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजूरी देण्यात आली. कर्जत तालुक्यातील पोशीर प्रकल्पास 6394.13 कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली. कुरूंग गावाजवळ पोशीर नदीवर 12.344 टीएमसी क्षमतेचे धरण बांधणे प्रस्तावित आहे. प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा9.721 टीएमसी आहे. त्यापैकी पिण्यासाठी 7.933 टीएमसी आणि औद्योगिक वापरासाठी 1.859 टीएमसी पाणी वापर प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचे पाणी मुंबई महानगर, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांना पाण्याकरिता पुरविले जाणार आहे.
यासह मौजे शिलार प्रकल्पांतर्गत मौजे किकवी येथे सिल्लार नदीवर 6.61 टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्याचा प्रस्ताव आहे. या योजनेस 4869.72 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचे पाणी मुंबई महानगर, पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका या शहरांना पाण्याकरिता पुरविले जाणार आहे.
‘प्रकल्प वेळेत पूर्ण करा’
सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेच्या सुधारित खर्चास तसेच पोशिर, शिलार सिंचन धरणांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान सिंचन प्रकल्प वर्षानुवर्ष रखडत असल्याने त्यांच्या किंमतीत होणाऱ्या वाढीवरुन काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. पोशिर धरण सात वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले असले तरी एवढा कालावधी कशाला हवा. चार-पाच वर्षांचा कालावधी पुरेसा आहे असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्याची सूचना केल्याचे समजते.
पालघर जिल्ह्यातही होतेय धरण
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे गावाजवळून वाहणाऱ्या पश्चिमवाहिनी वैतरणा नदीची उपनदी असलेल्या देहरजी नदीवर हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत माती व दगडांचा वापर करून धरण बांधण्यात येत असून या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 95.60 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. त्यापैकी 93.22 दशलक्ष घनमीटर म्हणजे साधारण प्रतिदिन 255 दशलक्ष लिटर इतके पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल.































