मुळशी (चांदे) : हिंजवडी – माण आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी व पाणी समस्यांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी आमदार शंकर मांडेकर यांची चांदे येथील जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन आपली कैफियत मांडली. नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या समस्यांवर तातडीने कार्यवाहीचे आश्वासन मांडेकर यांनी दिले.
या बैठकीत परिसरातील वाहनांच्या वर्दळीमुळे होणारी वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, तसेच पाण्याचा नियमित पुरवठा न होणे यावर भर दिला गेला. नागरिकांनी सांगितले की, “दररोज सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळेत वाहतूक खोळंबते. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामावर जाणाऱ्या लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.”
या तक्रारींवर सकारात्मक प्रतिसाद देताना आमदार मांडेकर म्हणाले, “नागरिकांच्या समस्या गांभीर्याने घेतल्या आहेत. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत संबंधित प्रशासनाशी संपर्क साधला असून, लवकरच सुधारणा दिसून येतील. तसेच पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठीही पावले उचलली जात आहेत.”
बैठकीदरम्यान पाणी पुरवठ्याबाबत स्थानिक पातळीवर समन्वय वाढविण्याचे ठरविण्यात आले असून, त्यासाठी PMRDA व स्थानिक ग्रामपंचायतींशी चर्चा करून एकात्मिक योजना राबवली जाणार आहे.
“नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भागाच्या सर्वांगीण विकासासाठी तुमचा पाठिंबा आणि सहभाग आवश्यक आहे,” असे आवाहन मांडेकर यांनी केले.
या संवादात अनेक रहिवासी, महिला प्रतिनिधी आणि युवक उपस्थित होते. नागरिकांनी आमदारांच्या तात्काळ प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांच्या पुढाकाराचे कौतुक केले.



































