मुळशी (पौड): मुळशी तालुक्यातील लवळे गावातील शेतकरी अरुण भिकोबा राऊत यांनी भुमी अभिलेख कार्यालय मुळशी पौड विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सलग सतराव्या दिवशी आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या सोहळ्यात, पौड पोलीस स्टेशन वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी आणि बावधन पोलीस स्टेशन वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या विनंतीवरून तसेच राऊत यांचे कुटुंबीयांनी केलेल्या कळकळीच्या विनंतीने, राऊत यांनी उपोषण सोडले. पोलिस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्या हस्ते शितपेय (ज्यूस) घेत उपोषण सोडले.
राऊत यांनी आपल्या उपोषणाच्या सोडण्यासंबंधी सांगितले की, भुमी अभिलेख विभागाने मला योग्य निर्णय आणि वागणूक दिली नाही. मी उपोषण सोडले असले तरी न्यायालयीन लढा सुरूच ठेवणार आहे. मुळशी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो, पण न्याय मिळवणे अवघड आहे. त्याचप्रमाणे, मुळशी तालुक्यात पैशाचा खेळ सुरू आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही.
अरुण राऊत यांनी मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आणि जर भुमी अभिलेख विभागाच्या तक्रारींबाबत अडचणी येत असतील, तर शेतकऱ्यांनी त्यांना मदतीसाठी संपर्क साधावा असे सांगितले. “आपण सर्व बाबी तपासून योग्य पद्धतीने निर्णय घेऊ,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.
पौड पोलीस स्टेशन वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी राऊत यांना समजावून सांगितले की, “उपोषण हा कोणताही पर्याय नाही. तुमचा कागदोपत्री लढा सुरू ठेवा, आम्ही तुम्हाला योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू.”
भारतीय जनता पार्टीचे सुनील शिंदे यांनी मंत्री मोहोदय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बरोबर राऊत यांचा संपर्क साधला, आणि भूमी अभिलेख अधीक्षक प्रभाकरजी मुसळे यांची भेट घेऊन सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शिवसेना नेते आबासाहेब शेळके यांनी राऊत परिवाराच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले.
मुळशी तालुका अध्यक्ष राजू फाले यांनी, राऊत परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कडे न्याय मागण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
तुषार अरुण राऊत यांनी मुळशी तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपोषणाला पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.


































