मुळशी तालुक्यात घनकचऱ्याचा वाढता विळखा; १ जानेवारीला रामनदी–ताम्हिणी परिसर स्वच्छतेसाठी ‘अमित कंधारे युवा मंच’चे अभियान
मुळशी : तालुक्यात गेल्या काही वर्षांत घनकचरा व प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असून त्याचा पर्यावरणावर तसेच पर्यटनस्थळ म्हणून मुळशीच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होत आहे. ही चिंताजनक परिस्थिती बदलण्यासाठी ‘अमित कंधारे युवा मंच’च्या माध्यमातून १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता भूगाव येथील रामनदीपासून ते ताम्हिणी घाटापर्यंत हायवेलगत साचलेल्या कचऱ्याच्या निर्मूलनासाठी व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.
या अभियानासाठी भूगाव, भूकुम, पिरंगुट, पौड ते ताम्हिणी तसेच कोंढावळे अशा ग्रामपंचायतींना आवाहन करण्यात आले आहे. “आपला कचरा ही आपली सामूहिक जबाबदारी आहे” या संदेशातून कचरा रस्त्यावर फेकण्याऐवजी शास्त्रीय पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, या समस्येच्या निराकरणासाठी मा. गटविकास अधिकारी आणि तहसीलदार मुळशी यांना अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला असून आगामी काळात महिनाभरासाठी हायवेलगतचा कचरा नियमित उचलण्यासाठी सक्षम कंपनीमार्फत विशेष टेंडर प्रक्रिया राबवण्याचा मानस आहे.
मुळशीमध्ये पुणे जिल्हा, महाराष्ट्र तसेच देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने तालुक्याची स्वच्छता आणि सौंदर्य टिकवणे आवश्यक असल्याचे आयोजकांचे मत आहे. पर्यटकांनी प्रवासादरम्यान कचरा रस्त्यावर न टाकता कचराकुंडीत टाकावा, अशी नम्र विनंतीही यावेळी करण्यात आली.
आगामी १ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या स्वच्छता अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मुळशी स्वच्छ, सुंदर व आदर्श पर्यटनस्थळ बनवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजक अमित कंधारे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

































