पंढरपूरच्या दिशेने मुळशी तालुक्यातील दिंडी क्रमांक ९६चे प्रस्थान
मुळशी (कोळवण,दि.१७): मुळशी तालुक्यातील वारकरी संप्रदायाची श्रद्धेची परंपरा जोपासणारी दिंडी क्रमांक ९६ने आज पंढरपूरच्या दिशेने भक्तिभावाने प्रस्थान ठेवले. कोळवण येथील भालगुडी परिसरातील स्वयंभू श्रीनारायणदेव मंदिरात सकाळी अभिषेक, पूजा यांसारख्या धार्मिक विधीनंतर सकाळी ८ वाजता दिंडीने ‘जय जय रामकृष्ण हरी’च्या गजरात मार्गस्थ झाली.
वारीपूर्व सायंकाळी डॉ. पांडुरंग साळुंखे यांनी शंभरहून
अधिक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. यानंतर बबन कंधारे यांचे प्रवचन व दिंडीचालक दशरथ महाराज वाहळे यांचे कीर्तन पार पडले.
या वर्षी दिंडीचे ७९ वे वर्ष असून, ६०० ते ६५० वारकरी यात सहभागी झाले आहेत. मुळशी तालुक्यातील सर्वच ९६ गावांचा या दिंडीत सहभाग असून, गेली ७८ वर्षे ही परंपरा अखंडपणे सुरु आहे. दिंडी बुधवारपर्यंत देहूमध्ये थांबून तुकाराम महाराज पालखी प्रस्थानानंतर गुरुवारी आळंदीतील ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मागे प्रस्थान ठेवणार आहे.
दिंडीचे आयोजन, व्यवस्थापन, शिस्तबद्धता आणि श्रद्धेचा उत्कट भाव यामुळे मुळशी तालुका वारकरी संप्रदाय संपूर्ण वारीमध्ये विशेषत्वाने ओळखला जातो. “वारकरी संप्रदायाने घालून दिलेला दंडक व नियम वारी दरम्यान काटेकोरपणे पाळला जातो,” असे प्रतिपादन दिंडीचे चालवणारे दशरथ महाराज वाहळे यांनी केले.
वारकऱ्यांच्या मनात “होय होय वारकरी डोळा पाहे रे पंढरी” अशा अभंगांचे सूर गुंजत असून, पंढरीच्या वारीची ओढ त्यांच्या प्रत्येक पावलातून जाणवत आहे.


































