भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) दुटप्पी हिंदुत्वाचा मुखवटा फाडण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहराच्या वतीने शनिवारी सारसबाग सिग्नल चौकातील स्वा. सावरकर स्मारकाजवळ तीव्र आंदोलन करण्यात आले.
.
पालघर साधू हत्याकांडातील आरोपी काशिनाथ चौधरी याला भाजपने पक्षात प्रवेश दिल्याच्या मुद्द्यावरून शिवसैनिकांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच, ड्रग्ज तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या विनोद गंगणे याला तुळजापूर नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी दिल्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
निवडणुकीपुरती मुस्लिम टोपी घालणाऱ्या आशिष शेलार यांच्या ‘खोट्या आणि बेगडी हिंदुत्वाचा’ बुरखा आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी फाडला. हे आंदोलन भाजपच्या प्रायोजित पाखंडी हिंदुत्वाला दिलेले सडेतोड प्रत्युत्तर असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले.
आंदोलनादरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा, सारसबाग सिग्नल चौक येथील बिकट स्थिती समोर आली. गेल्या अनेक दिवसांपासून पुतळ्याची दुरवस्था असून, प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.
शिवसैनिकांनी पुढाकार घेत पुतळ्याची स्वच्छता केली, पाण्याने अभिषेक केला आणि सावरकरांच्या चरणी दुग्धाभिषेक करून हिंदुत्वनिष्ठ भावना व्यक्त केली. राज्यातील सत्ताधारी भाजप-शिंदे सरकार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा केवळ अहवाल देणारे असून, त्यांच्या हिंदुत्वाला केवळ राजकारणासाठी वापरते, असे मत शिवसैनिकांनी व्यक्त केले. हिंदुत्वाचा वारसा जपण्याऐवजी समाजात फूट पाडण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप करत, आंदोलनातून ‘स्वा. सावरकर आम्हाला माफ करा’ अशी भावनिक गर्जना करण्यात आली. शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी या भावना व्यक्त केल्या.
या आंदोलनात माजी नगरसेवक अशोक हरणावळ, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, संघटक राजेंद्र शिंदे, कार्यालयीन सचिव मकरंद पेटकर, महिला आघाडीच्या उपशहर संघटिका अमृत पठारे, विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण, संदीप गायकवाड, विलास सोनावणे, शशिकांत पापळ, संतोष भुतकर, दीलीप पोमण, रोहीत गलांडे, गणेश घोलप, राहुल आलमखाने, रोहित लगाडे, नागेश खडके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.






















