बोगस आयएएस कल्पना भागवत प्रकरणात भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) निकालाची बनावट यादी बनवून देणाऱ्या चौथ्या आरोपीला सिडको पोलिसांनी श्रीगोंदा येथून शनिवारी (६ डिसेंबर) पहाटे बेड्या ठोकल्या. दत्तात्रय पांडुरंग शेटे (३८, रा. मांडवगण, ता. श्रीगोंदा, जि
.
चौकशीदरम्यान कल्पनाने सांगितले की, रिअल इस्टेट व्यावसायिक असलेल्या दत्तात्रय शेटे याच्याशी तिची ओळख झाली. “तुला आयएएस बनवून देतो,’ असे सांगून शेटेने कल्पनाला विश्वासात घेतले होते. त्यानंतर त्याने कल्पनाची ओळख मनोज लोढाशी करून दिली.
आरोपी शेटे लुंगीवर न्यायालयात हजर
संशयित शेटे हा लुंगीवर न्यायालयात आला. यामुळे एक वरिष्ठ पोलिस अधिकारी भडकले. त्यावर कर्मचाऱ्याने तेथील पार्किंग चालकाची दुचाकी घेऊन जात जवळील एका दुकानातून शेटेसाठी चक्क पँट आणली. कर्मचारी ही पँट घेऊन न्यायालयात आला. तेथे त्याने पँट परिधान केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची दिवसभर चर्चा होती.
तपास भांबावलेला; बचाव पक्षाचा दावा
बचाव पक्षाचे वकील ॲड. अभयसिंह भोसले आणि ॲड. प्रमोद चव्हाण यांनी पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह उभे केले. तपासाच्या १३ दिवसांतही पोलिसांना ठोस पुरावे मिळालेले नाहीत. सर्व व्यवहार बँक खात्यातून झाले आहेत. कल्पनाचा कोणत्याही देशविघातक कृत्याशी संबंध नाही, असा युक्तिवाद करत त्यांनी हा तपास भांबावलेला आणि गोंधळलेला असल्याचे सांगितले.
भूलथापांमुळे नोकरी सोडली
कल्पना भागवत ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नोकरी करत होती. शेटेशी ओळख झाल्यानंतर त्याने तिला मोठे प्रलोभन दिले. मी मोठ्या लोकांची कामे करतो, बदलीसह अनेक कामे मिळवून देतो. एका कामात १० लाख रुपये मिळतील, अशा गोड बोलण्यावर विश्वास ठेवून कल्पनाने विद्यापीठातील नोकरीच सोडून दिली.






















