मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच वरळीतील मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. मनसेकडून तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले संतोष धुरी अखेर भाजपच्या गोटात दाखल झाले.
.
भाजपमध्ये प्रवेशानंतर संतोष धुरी यांनी स्पष्ट केलं की, राज ठाकरे यांच्यावर त्यांची कोणतीही नाराजी नाही. मात्र मनसेच्या आतमध्ये काही “कटकारस्थानी” सक्रिय असल्याचा आरोप त्यांनी केल. आमच्या साहेबांनी एकदा सांगितलं होतं की, विठ्ठलाच्या बाजूला बडवे असतात. राग विठ्ठलावर नसतो, बडव्यांवर असतो. मनसेतही असेच काही बडवे आहेत, अशा शब्दांत त्यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणावर बोट ठेवलं. बाळा नांदगावकर यांच्यावर थेट आरोप करत त्यांनी, हेच बडवे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना झाकण्याचं काम करत असल्याचं म्हटलं.
धुरी यांनी सांगितलं की, पक्षात जास्त बोलणारे, पुढे येणारे चेहरे मुद्दाम बाजूला सारण्याचा प्रयत्न केला जातो. आमच्यामुळे पक्ष चर्चेत राहत होता. त्यामुळेच आम्हाला झाकण्याचा प्रयत्न झाला, असा दावा त्यांनी केला. बाळा नांदगावकर नेहमी युतीची गरज असल्याचं सांगायचे, पण त्या युतीत आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय याकडे त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही, असा गंभीर आरोपही धुरी यांनी केला. जागावाटपात मनसेच्या निष्ठावंतांवर अन्याय झाल्यामुळेच नाराजी वाढत गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मनसेमध्ये केवळ आपणच नाही तर आणखी अनेक नेते नाराज असल्याचा दावा करत संतोष धुरी यांनी मोठं विधान केलं. संदीप देशपांडे नाराज आहेत, अशी चर्चा मुद्दाम पसरवली जाते. म्हणजे त्यांनाही पक्षातून बाहेर जाण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न आहे, असं धुरी म्हणाले. निवडणूक होण्याआधी दोन-तीन मोठे आणि महत्त्वाचे चेहरे मनसेला सोडचिठ्ठी देतील, असा दावा त्यांनी केला. कोण कोण नाराज आहे यांची नावे आपण सध्या सांगणार नाही, पण पक्षातून कोण जाणार होते याची संपूर्ण माहिती आपल्याकडे असल्याचंही त्यांनी सूचकपणे सांगितलं.
संतोष धुरी यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिल्यास ते मनसेचे जुने आणि आक्रमक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. राज ठाकरे यांच्या प्रत्येक आंदोलनात ते सक्रिय सहभाग घेत असत. मागील मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तरीही वरळी परिसरात त्यांचा प्रभाव कायम होता. मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती आणि यावेळीही त्यांच्या उमेदवारीसाठी देशपांडे यांनी प्रयत्न केल्याची चर्चा होती.
अखेर धुरी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय
यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीमुळे जागावाटपाची गणितं बदलली. संतोष धुरी हे वॉर्ड क्रमांक 194 मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र जागावाटपात ही जागा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला सुटल्याने धुरी यांची संधी हुकली. याच मुद्द्यावरून मनसेतील नाराजी वाढली आणि अखेर धुरी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. 6 जानेवारी रोजी त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला.
वरळी आणि आसपासच्या भागात मनसेला हा मोठा धक्का
संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशामुळे मुंबईतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः वरळी आणि आसपासच्या भागात मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. धुरींच्या आरोपांमुळे मनसेच्या अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली असून, निवडणुकीआधी आणखी कोणते नेते पक्ष सोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे भाजपसाठी हा प्रवेश आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असून, मनसेतील असंतोषाचा फायदा भाजप कसा उचलतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.






















