पुण्यातील गुलटेकडी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात आपला किंवा आपल्या पत्नीचा कोणताही थेट अथवा अप्रत्यक्ष संबंध नसल्याचा ठाम दावा माजी आमदार व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद
.
बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ तयार करून आर्थिक अडचणी आणि काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले होते. याप्रकरणी शेख यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून स्वारगेट पोलीस ठाण्यात रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर आणि इतर काहींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त सत्र न्यायालयाने धंगेकर दाम्पत्याला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायालयातून दिलासा मिळाल्यानंतर वकील विजयसिंह ठोंबरे यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत धंगेकर बोलत होते.
वक्फ बोर्डाची नोटीस अन् राजकीय दबावामुळे प्रकल्प रखडला
आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्ट करत रवींद्र धंगेकर यांनी संबंधित प्रकल्पाची पार्श्वभूमी मांडली. ते म्हणाले, “संबंधित जागेचा पुनर्विकास करण्यासाठी ‘उत्कर्ष असोसिएट्स’ची स्थापना करण्यात आली होती. या प्रकल्पाला ‘रेरा’ची (RERA) अधिकृत मान्यता होती आणि बँकेने कर्जही मंजूर केले होते. मात्र, अचानक ती जागा वक्फ बोर्डाशी संबंधित असल्याची नोटीस आल्याने प्रत्यक्ष बांधकाम थांबवावे लागले. यामुळे प्रकल्प प्रचंड रखडला, आर्थिक नुकसान झाले आणि कर्जाचा बोजा वाढत गेला. राजकीय दबावापोटी हा प्रकल्प अडचणीत आणला गेला. माझी पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी २०२५ मध्येच या प्रकल्पातील आपली भागीदारी कायदेशीररीत्या सोडली होती.”
चिठ्ठीत माझे नाव नाही; चौकशीला पूर्ण सहकार्य करणार
खलील शेख यांचे पैसे जाणीवपूर्वक रोखून धरल्याचा आरोप फेटाळून लावताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, “कथित चिठ्ठीमध्ये कुठेही माझे नाव नाही. या प्रकरणाचे कोणतेही राजकीय भांडवल न करता पोलिसांनी उपलब्ध व्हिडिओ, कागदपत्रे आणि बँकेच्या सर्व आर्थिक व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करावी. आम्ही पोलिसांच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करण्यास तयार असून, निष्पक्ष तपासानंतर सत्य आपोआप जनतेसमोर येईल.”
नेमके प्रकरण काय?
बांधकाम व्यवसायिक खलील शेख यांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी सविस्तर व्हिडिओ बनवला होता, तसेच दोन पानी सुसाईड नोटही लिहिल्याचे तपासात समोर आले आहे. शेख यांनी ज्या इमारतीमध्ये आत्महत्या केली, तिच्या बाहेर एक चिठ्ठी चिकटवली होती, तर दुसरी चिठ्ठी पोलिसांना त्यांच्या खिशात सापडली. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला.
खलील शेख यांनी चिठ्ठीत आपल्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्यांची नावे लिहीत, संबंधितांकडे अडीच कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे नमूद केले आहे. शेख हे २०११ पासून पुण्यात सेंट्रिंगचे काम करत होते. या कामांसाठी त्यांनी बाहेरून चढ्या व्याजाने पैसे उचलले होते. भागीदारीतील मुख्य नेत्यांनी “आम्ही व्याजासह पैसे परत करू” असे आश्वासन दिले होते, मात्र ऐनवेळी पैसे न मिळाल्याने ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते.
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्याशिवाय शांत बसणार नाही:सरकार जेव्हा घाबरते तेव्हा हिंदू-मुस्लीम करते – आदित्य ठाकरे
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट)चे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय रंग न देता त्यांच्या हक्काच्या लढ्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. सविस्तर वाचा…
सरकारने हात पुढे केलाय, तुम्हीही हात द्या:भांडणे थांबवा, संवादाने मार्ग काढा; विद्यार्थी आंदोलनावर अभिनेते प्रशांत दामले यांचे आवाहन

दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोज जनता पार्टीच्या वतीने सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आणि वाढत्या तणावावर ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी आपली भूमिका मांडत सर्व संबंधितांना शांततेचे आणि संवादाचे कळकळीचे आवाहन केले आहे. “मला भांडणे किंवा मारामारी अजिबात आवडत नाही. मात्र, आजूबाजूची परिस्थिती पाहता आता व्यक्त होणे गरजेचे झाले आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी विद्यार्थ्यांचे भवितव्य जपण्यासाठी हे भांडण तात्काळ थांबवून चर्चेच्या माध्यमातून विषय संपवण्याची विनंती केली आहे. सविस्तर वाचा…





























