पुण्यातील तरुण महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे एका सर्वेक्षण अहवालातून समोर आले आहे. पुणे पॉप्युलेशन-बेस्ड कॅन्सर रजिस्ट्री (पीबीसीआर) आणि एमओसी कॅन्सर केअर सेंटरने केलेल्या या पाहणीनुसार, विशेषतः 30 ते 40 वयोगटातील मह
.
पीबीसीआरच्या अहवालानुसार, पुण्यात प्रति एक लाख महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचा वय-समायोजित प्रादुर्भाव दर (एएआर) 83.0 इतका नोंदवला गेला आहे. या आकडेवारीनुसार, स्तनाचा कर्करोग हा पुण्यातील महिलांमध्ये सर्वात जास्त आढळणारा कर्करोग असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. एमओसी कॅन्सर केअर सेंटरमध्येही गेल्या काही वर्षांत 30 ते 40 वयोगटातील रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
वैद्यकीय कर्करोगतज्ज्ञ डॉ. रितु दवे यांनी या स्थितीवर चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “आम्ही आता 30 ते 40 वर्षांच्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात पाहत आहोत. पूर्वी ही व्याधी मुख्यत्वे 50 वर्षांवरील महिलांमध्ये आढळायची, पण आता तरुण वयोगटातही ती आक्रमक स्वरूपात दिसत आहे.”
या वाढीला अनेक घटक कारणीभूत ठरत आहेत. निष्क्रिय जीवनशैली, अनियमित व फास्टफूडयुक्त आहार, मानसिक तणाव, व्यायामाचा अभाव, वाढती लठ्ठपणा आणि आनुवंशिक जोखीम हे त्यापैकी काही प्रमुख कारणे आहेत. याशिवाय, लवकर लग्न न करणे किंवा गर्भधारणा उशिरा करणे हे देखील घटक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जागरूकतेचा अभाव आणि लक्षणे दिसूनही वेळेवर तपासणी न केल्याने रोग उशिरा निदान होत असल्याचेही निरीक्षण आहे.
डॉ. दवे यांच्या मते, नियमित स्व-तपासणी, 40 वर्षांनंतर दरवर्षी मॅमोग्राफी आणि निरोगी जीवनशैली अवलंबल्यास या धोक्याचे प्रमाण खूप कमी होऊ शकते. लवकर निदान झाल्यास उपचार यशस्वी होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा जास्त असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एमओसी आणि पीबीसीआरने पुण्यातील महिलांना आतापासूनच सतर्क राहण्याचे आणि नियमित स्तन तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जागरूकता आणि सक्रिय प्रतिबंधात्मक उपायांमुळेच या चिंताजनक प्रवृत्तीला आळा घालता येईल.






















