मुंबईतील पवई येथे १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत या प्रकरणावर माहिती दिली. लहान मुलांची सुखरूप सुटका करण्यासाठीच आर्याचे एन्काउंटर करण्यात आल्याचे भोयर यांनी सांगितले.
.
आर्याने ऑडिशनच्या नावाखाली ७ ते १४ वयोगटातील २० मुला-मुलींना ओलीस ठेवले होते. त्याने माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलण्याची मागणी केली होती. यापूर्वी त्याने केसरकर यांच्या घरासमोर उपोषणही केले होते.
पोलिसांनी समयसूचकता बाळगत आर्याला ठार केले. बॅलिस्टिक रिपोर्टमध्ये त्याच्या गनमध्ये गोळ्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलांच्या सुरक्षित सुटकेसाठीच हे पाऊल उचलण्यात आल्याचे गृहराज्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.
या लक्षवेधीवर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. कमरेच्या खाली गोळी मारण्याचा नियम असताना थेट गोळी का मारण्यात आली? एन्काउंटरसाठी वाघमारे यांनाच का आणण्यात आले? आर्याने नाव घेतलेल्या मंत्र्यांची चौकशी झाली काय? आर्याची देयके सरकारकडे बाकी आहेत की नाही? असे सवाल वडेट्टीवार यांनी केले.
गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, सल्लागार असलेल्या आर्याने सीएसआरच्या माध्यमातून एक प्रकल्प आणला होता. त्याने परवानगी नसताना शाळांकडून पैसे गोळा केले होते. ते पैसे परत करण्यासाठी आर्याला नोटीस बजावण्यात आली होती. सीएसआर अंतर्गत केलेल्या दोन टप्प्यांचे ९ लाख ९० हजार रुपयांचे पेमेंट करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
नाना पटोले आणि दिलीप लांडे यांनीही या प्रकरणी प्रश्न उपस्थित केले. ठेकेदाराचे पैसे थकत होते, पण आता सल्लागाराचेही पैसे थकले हा नवा प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण हाताळण्यात सरकार दोषी असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी केला. सखोल चौकशी करून अधिवेशनात अहवाल सादर करण्याची मागणी पाटील यांनी केली.






















