रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आणण्यात आलेल्या मतदान यंत्र अर्थात ईव्हीएमवर मध्यप्रदेश निवडणूक असा नामोल्लेख आढळला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अजीम जैतापकर यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या
.
राज्यात बऱ्याच वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फड रंगला आहे. त्यानुसार, राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. प्रशासनाने या निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आणलेल्या मतदान यंत्रावर मध्यप्रदेश निवडणूक असे नाव आढळल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. काँग्रेसचे राजापूर शहराध्यक्ष अजीम जैतापकर यांनी या प्रकरणी आपला आक्षेप नोंदवला आहे.
काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
जैतापकर यांनी याविषयी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्याकडे तक्रार दाखल केली. ‘शुक्रवारी ईव्हीएम सील करताना नगरपरिषदेकडून त्यांना उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली होती. त्यावेळी मशीनच्या पेट्या उघडून पाहण्यात आला. त्यात सर्व ईव्हीएमवर मध्य प्रदेश निवडणूक अशी नोंद दिसून आली. महाराष्ट्रातील राजापूर नगरपालिकेची निवडणूक असताना इथे इतर राज्यातून आलेल्या मशीनवर निवडणूक घेणे संशयास्पद आहे. त्यामुळे या मशीनचा वापर का केला जात आहे? याचा प्रशासनाने खुलासा करावा किंवा महाराष्ट्रातील ईव्हीएम मशीन बदलून देण्यात यावी,’ अशी अजीम जैतापकर यांनी एका निवेदनाद्वारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी काय म्हणाले?
दुसरीकडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणी आपली बाजू स्पष्ट केली आहे. प्रस्तुत ईव्हीएम मशीन आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्या आहेत. त्याविषयी काही शंका असल्यास त्यांच्याकडे दाद मागावी. त्यानुसार जैतापकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र पाठवून या मशीनविषयी तक्रार दाखल केली आहे. आता या तक्रारीननंतर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
असा आहे स्थानिकच्या निवडणुकीचा कार्यक्रम
| उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात | 10 नोव्हेंबर 2025 |
| उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत | 17 नोव्हेंबर 2025 |
| उमेदवारी अर्जांची पडताळणी | 18 नोव्हेंबर 2025 |
| अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत | 21 नोव्हेंबर 2025 |
| अपिल असलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत | 25 नोव्हेंबर 2025 |
| निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी जाहीर | 26 नोव्हेंबर 2025 |
| मतदानाचा दिवस | 2 डिसेंबर 2025 |
| मतमोजणी | 3 डिसेंबर 2025 |
| शासन राजपत्रात निकाल घोषित करण्याचा दिवस | 10 डिसेंबर 2025 |
























