राज्याचे कुलदैवत खंडेराय म्हणजे शौर्य,भक्ती आणि सेवेचा अद्वितीय संगम असून अशा धार्मिक सोहळ्यांमुळे शहराच्या आध्यात्मिक व धार्मिक वैभवात मोलाची भर पडते. सत्कर्म व धर्माचरणातून जीवनातील संकटे दूर होतात, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
.
कसबा विभागातील खंडोबा भक्त व सेवानिवृत्त शिक्षक अशोक साठे यांच्या पुढाकारातून गेल्या काही वर्षांपासून खंडेरायाचा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. साठे परिवाराने सामूहिक स्वरूपात सुरू केलेल्या या परंपरेला भाविकांचा प्रतिसाद लाभत आहे. नाशिक,पैठण, अहिल्यानगर, शेवगाव व बीड परिसरातूनही भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी नगराध्यक्ष अभय आव्हाड, बाळासाहेब सोनटक्के,रामेश्वर लाहोटी,नगरसेवक सुभाष बोरुडे,मंगल कोकाटे,अमोल गर्जे, मुकुंद लोहिया, नाशिकचे नंदकुमार भुतडा, कालभैरवनाथ देवस्थानचे पुजारी दादा मर्दाने, मोहन सुडके महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शुक्रवारी रात्री हळदीचा कार्यक्रम पार पडला. यात कसबा विभागातील महिला भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विवाहाचे धार्मिक विधी सामूहिकरीत्या पार पाडले. शनिवारी सायंकाळी लाहोटी वाडा येथील खंडोबा मंदिरातून देवाची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी,पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि जयघोषात काळभैरवनाथ देवांनाही सोबत घेत मिरवणूक विवाहस्थळी पोहोचली.विवाहस्थळी म्हाळसादेवीची नववधू रूपातील आकर्षक सजावट करण्यात आली होती.फुलांची सजावट,रांगोळ्या व सुशोभित मंडपाने परिसर नटला होता.वेदमंत्रोच्चार आणि मंगलाष्टकांच्या घोषात खंडेरायाचा विवाह सोहळा झाला.उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.आमदार राजळे म्हणाल्या, साठे कुटुंब धार्मिक व सेवाभावी म्हणून परिचित आहे. कसबा विभाग प्राचीन मंदिरांसाठी ओळखला जातो. खंडोबा देवाची उपासना राज्यभर होत असून अशा सार्वजनिक धार्मिक सोहळ्यांमुळे शहरात अध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि सकारात्मक चळवळ उभी राहते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक साठे,सिंधू साठे,अजय साठे,अनिल साठे,परिमल बाबर,अर्चना साठे,अनुराधा साठे,कृष्णा साठे आदींनी परिश्रम घेतले.






















