शहरातील सिडकोच्या उच्चभ्रू वसाहतीमधील प्राध्यापक खून खटल्यात आरोपी मुलाला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी बुधवारी (१० डिसेंबर २०२५) जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली. मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख असलेल्या पित्याचा
.
पुणे निरीक्षण गृहात घटना घडल्यापासून असलेल्या आरोपी मुलाने आता वयाची एकवीस वर्षे पूर्ण केलेली असल्याने त्यास हर्सूल कारागृहात हलवण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी दिले आहेत. खटल्यात ३२ पैकी ४ साक्षीदार फितूर झाले. पोलिसांनी केलेला योग्य तपास, पुरावे, डंबेल्सने खून केल्याचा पुरावा, मुलाने खुनाच्या २ दिवसांपूर्वी वेबसिरीज बघितल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या कलमानुसार ठरवले दोषी
खटल्याच्या सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील ए.एस. देशपांडे यांनी ३२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यातील प्रमुख चार साक्षीदार हे फितूर झाले. सुनावणीअंती क्रूर कृत्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि अल्पवयीम मुलाला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम २५८(२) नुसार भादंवि कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवून त्यास आयुष्यभर कठोर कारावासाची शिक्षा आणि १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांची अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.
नेमके काय घडले होते खुनाच्या ‘त्या’ रात्री?
प्राध्यापक वडील सतत अपमान करतात म्हणून मुलाच्या मनात प्रचंड राग होता. १० ऑक्टोबर रोजी वाद झाल्यानंतर पिता आपल्या घरात हॉलमध्येच झोपी गेले होते. ही संधी साधून संबंधित मुलाने त्यांच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार त्याने ११ ऑक्टोबर २०२१ च्या पहाटे तीनच्या सुमारास गाढ झोपलेल्या पित्याच्या डोक्यात डंबेल्सने वार केला. हा वार इतका भयंकर होता की ते कसलाही आवाज न करता जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला. पण वडील जिवंत असावेत असे वाटल्याने त्याने किचनमधील चाकूने त्यांच्या हाताच्या नसा कापल्या तसेच गळाही चिरला होता.
तत्कालीन पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी जाऊन केला तपास
हत्येनंतर आरोपीने खुनाचे साहित्य घराजवळील विहिरीत फेकून दिले होते. पोलिसांनी विहिरीतील पाणी उपसून सर्व पुरावे जप्त केले. तत्कालीन पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी स्वत: घरात जाऊन हत्या झाल्याचा तपास केला. पलंगाखाली गुडघ्यावर बसून त्यांनी सर्व बाबी न्याहाळल्या होत्या, तर आरोपीने हत्या करण्यासाठी वापरलेली सर्व शस्त्रे टॉवेलमध्ये गुंडाळून विहिरीत टाकली.
या बाबींनी निकाल ठरवला निर्णायक
खटल्यात चाकू, टर्कीश टॉवेल, मॅट्रेस, कव्हर पिलो, पाण्याची बॉटल, मेमरी कार्ड, सिडी, डीव्हीडी, छन्नी, कडीकोयंडा आदी बाबी निर्णायक ठरल्या. यावरून मुलास शिक्षा ठोठावण्यात आली.
कोर्टापुढील सर्वात मोठे आव्हान
या खटल्यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे आरोपीचे अल्पवयीन असणे. मात्र, गुन्ह्याची तीव्रता आणि निर्दयता पाहता पोलिसांनी जुवेनाइल जस्टिस ॲक्ट २०१५ मधील तरतुदीनुसार, आरोपीला प्रौढ मानण्याची मागणी बाल न्याय मंडळाकडे केली. मंडळाने पोलिसांचे युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे विचारात घेऊन आरोपीला ‘प्रौढ’ मानत, खटला चालवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाकडे हस्तांतरित केला. न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील ही एक अत्यंत कठोर आणि महत्त्वाची भूमिका ठरली.
रिसर्च, नियोजनानंतर खून
आरोपीने खुनाच्या आधी अनेक दिवस मर्डर मिस्ट्री आणि क्राइम थ्रिलर वेबसिरीज पाहिल्या होत्या. तपासात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने गुन्हेगारी कृती आणि पुरावे नष्ट करण्याच्या पद्धती शोधण्यासाठी केवळ सामान्य गुगलचा नव्हे, तर पोलिसांना ‘ट्रॅक’ करणे कठीण असलेल्या ‘डार्क वेब’ आणि ‘टीओआर’ ब्राउझरचा वापर केला होता.






















