राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू असताना, पक्षांतर्गत मुलाखती, गटबाजी आणि रणनीती आखण्याची लगबग सर्वत्र दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर, उमेदवारीची खात्री
.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रचारयंत्रणा उभारणे, प्रभागनिहाय समीकरणे तपासणे आणि संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच काँग्रेससाठी धक्कादायक घटना घडली आहे. काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशिद खान उर्फ मामू यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः त्यांचे पक्षात स्वागत केले. या प्रवेश सोहळ्यावेळी शिवसेनेचे नेते, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. काँग्रेसमध्ये दीर्घकाळ प्रभावी भूमिका बजावलेल्या नेत्याच्या या निर्णयामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अब्दुल रशिद खान उर्फ मामू हे छत्रपती संभाजीनगरमधील परिचित आणि प्रभावी नेतृत्व मानले जातात. त्यांनी महापौरपद भूषवले असून, अल्पसंख्याक समाजात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यांच्या शिवसेना ठाकरे गटातील प्रवेशामुळे काँग्रेसची संघटनात्मक ताकद कमी झाली असून, ठाकरे गटाला मात्र मोठे बळ मिळाले आहे. केवळ एक नेता नव्हे, तर त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी मशाल हाती घेत शिवसेनेत सामील झाले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे गट अधिक आक्रमक भूमिकेत दिसेल, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. विशेषतः अल्पसंख्याक मतदारांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपची ठाकरे गटावर टीका
काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशिद खान उर्फ मामू यांच्या ठाकरे गटात प्रवेशावर भाजपने जोरदार निशाणा साधला आहे. या संदर्भात महाराष्ट्र भाजपने म्हटले की, पाकिस्तान जिंदाबाद म्हणत हिंदूंची घर जळणारा उबाठा गटाचा आता लाडका ‘मामू’ झाला. छत्रपती संभाजीनगर येथे ‘पाकिस्तान जिंदाबाद’ च्या घोषणा देत याने हिंदूंच्या घरांना लक्ष केले. घर जाळले, पोलिसांवर आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला करणारा हा ‘अब्दुल रशीद खान’ याला राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत अटक देखील झाली होती. १९९३ च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार इकबाल मुसा ते अशा दंगलखोरांपर्यंत… उबाठा गटाचा प्रचार आता कोणाच्या जीवावर सुरू आहे? हीच का तुमची हिंदुत्वाची व्याख्या? मुंबईकर आता या ‘खान मानसिकते’ला गाडल्याशिवाय राहणार नाहीत! दुर्दैव असे की, हिंदूविरोधी दंगलीचा मुख्य आरोपीचा पक्षप्रवेश स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो समोर करून घेण्यात आला.
व्यापक राजकीय समीकरणांवरही परिणाम
दरम्यान, राज्यातील महापालिका निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीच्या अवघ्या काही आठवड्यांवर असताना घडलेल्या या पक्षांतरांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेसला बसलेले हे धक्के केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता, राज्यातील व्यापक राजकीय समीकरणांवरही परिणाम करू शकतात. आगामी काळात आणखी कोणते नेते पक्षांतर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक मनोज बन्सीलाल गांगवे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.






















