छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने उमेदवार निवड प्रक्रियेला वेग दिला असून, शहरात सध्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. शिवसेनेच्या प्रचार कार्यालयात होत असलेल्या या मुलाखतींमुळे राजकीय वातावरण तापले आह
.
शिवसेनेच्या प्रचार कार्यालयात सुरू असलेल्या मुलाखतींना मोठा प्रतिसाद मिळत असून, या प्रक्रियेला जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि ज्येष्ठ नेते अशोक पटवर्धन उपस्थित आहेत. या टप्प्यात प्रामुख्याने नव्या इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. पहिल्याच दिवशी 350 इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असून, दुसऱ्या दिवशीही ही प्रक्रिया सुरूच आहे. महापालिका निवडणुकीत संधी मिळावी यासाठी मोठ्या संख्येने नव्या चेहऱ्यांनी अर्ज केल्यामुळे मुलाखतींना अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत असल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
राजकीय ताकदीचा आणि पूर्वीच्या कामगिरीचा आढावा
दरम्यान, शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपावर चर्चा करण्यासाठी दुपारी महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत शिवसेनेच्या वतीने आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि ऋषिकेश जैस्वाल सहभागी झाले. तर भाजपकडून शहराध्यक्ष किशोर शितोळे, समीर राजूरकर, माजी महापौर भगवान घडामोडे आणि माजी उपमहापौर प्रशांत देसरडा हे चर्चेत सहभागी झाले. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, युतीतील जागावाटप करताना ज्या पक्षाकडे पूर्वी ज्या जागा होत्या, त्याच आधारावर शिवसेना आपला प्रस्ताव मांडणार आहे. त्यामुळे युतीतील दोन्ही पक्ष आपापल्या राजकीय ताकदीचा आणि पूर्वीच्या कामगिरीचा आढावा घेत तोडगा काढण्याच्या तयारीत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण अधिकच चुरशीचे बनले
नवीन इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने माजी नगरसेवक तसेच इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती ठरलेल्या दिवशी होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती पुढील टप्प्यात, म्हणजे नवीन इच्छुकांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घेतल्या जाणार आहेत. पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या आणि युतीतील जागावाटप या दोन्ही आघाड्यांवर सुरू असलेल्या हालचालींमुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण अधिकच चुरशीचे बनले आहे. 23 तारखेपर्यंत युतीबाबत निर्णय झाल्यास उमेदवारांची अंतिम यादी आणि प्रचाराची दिशा निश्चित होणार असून, त्यानंतर निवडणूक रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल, असे चित्र सध्या दिसत आहे.






















