पार्टी केल्यानंतर झालेल्या वादातून आईवरून शिवी दिल्याचा राग मनात धरून मित्रानेच मित्राचा गळा आवळून निर्घृण खून करून मृतदेह विद्युत खांबाला वायरने बांधून ठेवल्याची घटना कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात मंगळवारी उघडकीस आली. दुचाकीतील पेट्रोल संपल्या
.
सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अवघ्या सहा तासांत मनीष जालिंदर राऊत (२८, रा. कळंबा रिंगरोड, राऊत कॉलनी) याला अटक केली. सिद्धू शंकर बनवी (२०, सध्या रा. वाशी नाका, कळंबा रिंगरोड, मूळ रा. शिकनंदी, ता. गोकाक, जि. बेळगाव) असे मृताचे नाव आहे. सोमवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हॉकी स्टेडियम परिसरातील एका लाइटच्या खांबाला तरुणास बांधल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता तरुण मृत झाल्याचे दिसून आले. त्याला वायरने खांबाला बांधण्यात आले होते. तरुणाच्या तोंडातून रक्त येत होते. हा खून असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणसह चारही पोलिस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकांना घटनास्थळी पाचारण केले. मृत तरुणाची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
मृताच्या खिशात गुटख्याची पुडी
मृताच्या खिशामध्ये ओळखीचा कोणताही पुरावा नव्हता. मृताच्या खिशात केवळ दोन गुटख्याच्या पुड्या मिळाल्या. पोलिसांनी खबऱ्यांचे नेटवर्क वापरून मृताची ओळख पटवली. सकाळी १० च्या सुमारास मृत तरुण सिद्धू बनवी असल्याचे समोर आले. मृत सिद्धूच्या मोठ्या भावाकडे शिवानंद ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरमध्ये वाळू, खडी विटा भरण्याचे काम सिद्धू व मनीष करतात. हे दोघेही एकमेकांचे जिवलग मित्र आहेत. मात्र, असे असूनही मित्राचा खून केल्याने परिसरात याचीच चर्चा आहे.
रात्री २ पर्यंत केले मद्यप्राशन
रविवारी सुटी असल्याने रात्री अकराच्या सुमारास दोघे दारू पिण्यासाठी बसले होते. रात्री २ वाजेपर्यंत दारू पिऊन झाल्यानंतर हॉटेलमध्ये ते जेवणासाठी गेले होते. जेवताना दोघांमध्ये वाद झाला. यातूनच सिद्धूने मनीषला आईवरून शिवीगाळ केली. जेवण आटोपून दोघेही दुचाकीवरून घरी निघाले. यावेळी हे दोघे लघुशंकेसाठी थांबले. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी रस्त्याच्या कडेला खांबाला टेकून बसलेल्या सिद्धूचा तेथीलच वायरने मनीषने गळा आवळला आणि त्याचा मृतदेह खांबाला बांधला.






















