नागपूर विभागाचा एचएससी बोर्डाचा निकाल आज, सोमवारी जाहीर झाला आहे. यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ८७.५८ टक्के लागला असून, भंडारा तालुक्याचा निकाल ९५.९३ टक्के आहे. लाखांदूर तालुक्याचा निकाल सर्वात कमी लागला असून त्याची टक्केवारी ७५.५६ इतकी आहे. या परीक्षे
?
यावर्षी फेब्रुवारी व मार्च २०२५ मध्ये बाराव्या वर्गाची परीक्षा झाली होती. १२ व्या वर्गात भंडारा जिल्ह्यातून एकूण १६ हजार ५१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ हजार ४३८जण परीक्षेला बसले होते. त्यापैकी १४ हजार ३९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ७११३ मुले आणि ७२८४ मुली आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८३.५० टक्के असून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.९५ टक्के आहे.
परिणाम
१२ व्या वर्गाच्या परीक्षेत भंडारा तालुक्यातून ४५५४ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी ४३६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ९१.९३ आहे. तसेच लाखनी तालुक्याचा निकाल ८३.०८ टक्के, मोहाडी तालुका ८७.५४ टक्के, पवनी तालुका ८५.६४ टक्के, साकोली तालुका ९०.२३ टक्के, तुमसर तालुका ८२.८९ टक्के आणि लाखांदूर तालुक्याचा निकाल ७५.५६ टक्के लागला आहे. या परीक्षेत मोहाडी तालुक्यातून सर्वात कमी १८३१ विद्यार्थी बसले तर, भंडारा तालुक्यातून सर्वाधिक २४४४ विद्यार्थी बसले होते.
बारावीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शाळेतील शिक्षकांकडून सत्कार करण्यात आला
विज्ञान शाखेचा बोलबाला कायम
यावर्षी बाराव्या वर्गाच्या परीक्षेत १६,४३८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ९,२५२ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेतून परीक्षा दिली. त्यामधून ८,९५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांची टक्केवारी ९६.७३ आहे. यातील मुलांची टक्केवारी ९५.५७ आणि मुलींची टक्केवारी ९७.८१ इतकी आहे.
वाणिज्य शाखेतून १२ व्या वर्गाच्या परीक्षेला ७७३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ६७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ८७.५८ इतकी आहे. कला शाखेतून ६,२३१ मुलामुलींनी १२ व्या वर्गाची परीक्षा दिली. त्यापैकी ४,६३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, टक्केवारी ७४.३४ आहे. याशिवाय व्होकेशनल (व्यावसायिक अभ्यासक्रम) मधून १४४ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १०५ उत्तीर्ण झाले असून, त्यांचे पास होण्याचे प्रमाण ७२.९१ टक्के आहे. तसेच तांत्रिक अभ्यासक्रमातून ३८ जणांनी बाराव्या वर्गाची परीक्षा दिली. त्यापैकी ३२ जण उत्तीर्ण झाले असून, टक्केवारी ८४.२१ इतकी आहे.
प्रावीण्य श्रेणीत ४४७ विद्यार्थी
भंडारा जिल्ह्यातून १२ व्या वर्गाच्या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ४४७ विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. २५१४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ७५१२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि ३९२४ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.































