सेनगाव तालुक्यातील घोरदरी शिवारामध्ये जबरीचोरी प्रकारणामध्ये सेनगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अन्य तीन आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण
?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील घोरदरी शिवारामध्ये शुक्रवारी ता ६ माणिक साबळे यांच्या कुटुंबीयांना मारहाण करून तसेच चाकूचा धाक दाखवून चार चोरट्यांनी घरातील साडेतीन लाख रुपये रोख व सोन्या चांदीचे दागिने असा चार लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला होता. याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा व सेनगाव पोलिसांचे पथक स्थापन केले होते.
दरम्यान मागील चार दिवसापासून सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक मारुती सोनकांबळे, जमादार सुभाष चव्हाण, टी. के. वंजारे, जाधव, यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला होता या प्रकरणातील एक आरोपी वाढोणा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी ता 10 येथे छापा टाकून रमेश काळे याला अटक केली. अधिक चौकशी मध्ये त्याच्याकडून चोरीला गेलेल्या मुद्देमाला पैकी 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सेनगाव पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची ता 13 जून पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
या प्रकरणात पोलिसांच्या पथकाने अन्य तीन आरोपींचा शोध सुरू केला असून त्यासाठी मराठवाडा सह विदर्भात पथके पाठविण्यात आली आहेत. लवकरच उर्वरित तीन आरोपींना अटक केली जाईल असा दावा पोलिसांनी केला आहे.






























