ऑटो बातम्या: भारतात मागील काही वर्षांमध्ये SUV सेगमेंटमध्ये एकाहून एक सरस कार विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं पाहायला मिळालं. ग्राहकांनीसुद्धा या कारना पसंती देत आपल्या प्रवासासाठी साजेशी कार निवडली. भारतीयांच्या कार खरेदीमध्ये त्या वाहनाची किंमत, मायलेज, फिचर या आणि अशा अनेक निकषांना केंद्रस्थानी ठेवलं जातं.
भारतात प्रामुख्यानं कारप्रेमींचं लक्ष वेधणाऱ्या आणि ग्राहकपसंती मिळणाऱ्या अशाच दोन कार म्हणजे किया सेल्टोस आणि होंडा एलिवेट (Kia Seltos, Honda Elevate). या दोन्ही कारचे फिचर पाहता ग्राहक अनेकदा कोणती कार निवडायची या गोंधळात असतानाच त्यांच्यामधील काही लहानमोठे फरक पाहणंही महत्त्वाचं.
इंजिन, फिचर्स आणि किमतीतील फरक…
New Kia Seltos सध्या होंडा एलिवेटच्या तुलनेत इंजिनच्या बाबतीत उजवी आहे यामध्ये दोन पेट्रोल आणि एका डिझेल इंजिनचा पर्याय कंपनी देते. 1.5 लीटर नॅच्युरली एस्पिरेटेज इंजिन, या कारला 115 PS पॉवर आणि 144 एनएम टॉर्क जनरेट करण्यास मदत करतं. तर, कारमध्ये ट्रांसमिशनसाठी मॅन्युअल, IVT, iMT, ऑटोमॅटिक असेही फिचर मिळतात.
Honda Elevate मध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन, 121 PS पॉवर आणि 145 Nm इतका टॉर्क मिळतो. 6 स्पीड मॅन्युअल आणि सीवीटी गिअरबॉक्स असे पर्याय या कारमध्ये मिळतात. मात्र तरीही होंडाच्या तुलनेत किया सेल्टॉस ही कार अधिक सोयीची ठरते.
या दोन्ही कारच्या फिचरचा विचार करायचा झाल्यास, New Kia Seltos मध्ये 30-इंचांचा ट्रिनिटी डिस्प्ले, 12.3-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, 12.3-इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर वेंटिलेटेड सीट्स, 10-वे पावर ड्राइवर सीट, 64-कलर एंबिएंट लाइटिंग, बोस साउंड सिस्टम, वायरलेस चार्जर, पॅनोरमिक सनरूफ, Level-2 ADAS मिळतात. तर, Honda Elevate मध्ये मात्र तुलनेनं काहीसे बेसिक फिचर देण्यात येतात. ज्यामध्ये LED लाइट्स, 10.25-इंच टचस्क्रीन, सिंगल-पेन सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रियर AC वेंट, PM 2.5 एयर प्यूरीफायर हे फिचर देतात.
कोणती कार ठरेल उत्तम डील?
राहिला मुद्दा खर्चाचा आणि चांगल्या पर्यायाचा तर, कियाच्या कारची किंमत 2 जानेवारी 2026 ला घोषित केली जाणार आहे. मात्र होंडा एलिवेटच्या तुलनेत ही कार काहीशी महाग असेल असा प्राथमिक अंदाज आहे. होंडा एलिवेटची एक्स शोरुम किंमत 11 लाख चे 16.67 लाखांच्या घरात असल्यानं पैशांच्या बाबतीत कियाच्या तुलनेत लांबच्या प्रवासासाठी अनेकांनाच होंडाची कार परवडतेय हेच स्पष्ट होत आहे.






























