भारतीय महिला क्रिकेट संघातील धडाकेदार खेळाडू स्मृती मंधानाचं संगीतकार पलाश मुच्छल याच्याशी लग्न ठरले होते. मात्र, लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले. नंतर काही दिवसांतच स्मृतीने हे लग्न पूर्णपणे मोडल्याची माहिती सोशल मीडियावर दिली. या निर्णयानंतर स्मृती सार्वजनिक कार्यक्रमांपासून काहीशी दूर राहत आहे.
आता स्मृतीने आणखी एक मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. तिने थेट एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय शोमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये महिला क्रिकेट संघ हजर पण…
हा शो दुसरा तिसरा कोणी नसून ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ आहे. या शोमध्ये लवकरच कॉमेडी आणि क्रिकेटचा निराळाच संगम पाहायला मिळणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या शोच्या चौथ्या सीझनचा नवा एपिसोड 27 डिसेंबर रोजी संध्याकाळी 8 वाजता नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. विशेष बाब म्हणजे या खास एपिसोडमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ सहभागी होणार आहे.
नोव्हेंबर 2025 मध्ये भारतीय महिला संघाने आयसीसी विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला होता. या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष आता कपिल शर्माच्या मंचावर गंमत, मजा आणि धमाल पद्धतीने साजरा केला जाणार आहे. या एपिसोडमध्ये हरमनप्रीत कौरसोबत ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग, हरलीन देओल, राधा यादव, प्रतीका रावल आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार उपस्थित असतील.
स्मृती मानधनाचा शोमध्ये सहभाग नसेल?
स्मृती मानधनाने या शोमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. पलाश मुच्छलसोबतच्या प्रकरणानंतर तिने काही काळ कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. ती प्रत्यक्ष स्टेजवर नसली तरी चर्चेचा भाग तर राहणारच.
शोच्या प्रोमोमध्ये कपिल शर्मा हरमनप्रीतच्या ट्रॉफी उंचावण्यापूर्वीच्या भांगडा क्षणाचा उल्लेख करतात. त्यावर खुलासा होतो की हरमनप्रीतला भांगडा करण्यासाठी स्मृतीनेच प्रोत्साहित केले होते. जेमिमा रॉड्रिग्स गंमतीने सांगते, “हॅरी दीदी आमचं ऐकत नाहीत, पण स्मृतीने सांगितलं होतं की भांगडा केला नाही तर मी आयुष्यभर बोलणार नाही.”
हशा, गंमत आणि कपिलची मॅचमेकर भूमिका
शोमध्ये कपिल शर्मा आपल्या खास शैलीत सर्व खेळाडूंशी गप्पा मारताना दिसत आहे. शेफाली वर्माच्या एका उत्तरामुळे कपिल थोडा गोंधळलेला दिसतो, तर रेणुका सिंगकडे तो नेहमीप्रमाणे ‘मॅचमेकर’ भूमिकेत जातो. एकूणच हा एपिसोड मनोरंजन, हशा आणि देशाभिमानाने भरलेला असणार आहे. स्मृती नसली तरी तिच्या गप्पांमुळे आणि महिला क्रिकेट संघाच्या विजयामुळे हा एपिसोड नक्कीच खास ठरणार आहे.































