जसप्रीत बुमराह व्हायरल व्हिडिओ: भारतीय संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या मैदानावरील कामगिरीपेक्षा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. यामध्ये बुमराहचा भडकलेला अवतार बघायला मिळाला. चला नेमकं काय झालाय ते जाणून घेऊयात. धर्मशाला टी20 सामन्यानंतर विश्रांती घेतल्यानंतर तो लखनऊ टी20 सामन्यासाठी संघात परतला होता. मात्र चौथा टी20 सामना दाट धुक्यामुळे रद्द झाल्याने बुमराहला खेळण्याची संधी मिळाली नाही. तरीही त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं घडलं तरी काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बुमराह एखाद्या विमानतळावर एस्केलेटरवरून खाली उतरत असल्याचे दिसते. त्याचवेळी एक चाहता संधी साधत त्याचा सेल्फी व्हिडीओ शूट करू लागतो. सुरुवातीला बुमराहने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्या चाहत्याने थांबविण्याची विनंती करूनही मोबाईल कॅमेऱ्याने शूटिंग सुरूच ठेवल्याने बुमराह चिडलेला दिसला.
वॉर्निग देऊनही चाहता ऐकेना
बुमराहने त्या चाहत्याला स्पष्टपणे सांगितले की अशा प्रकारे व्हिडीओ काढल्यास त्याचा मोबाईल पडून खराब होऊ शकतो. मात्र चाहत्याने “काही हरकत नाही” असे उत्तर देत शूटिंग थांबवले नाही. इतकंच नव्हे तर तो “आम्हीही तुमच्यासोबतच चाललो आहोत” असे म्हणताना दिसतो.
अखेर बुमराहचा संयम सुटला
चाहत्याने सतत व्हिडीओ काढत राहिल्यामुळे अखेर बुमराहने त्याच्या मोबाईलवर हात मारत त्याला दूर ढकलले. व्हिडीओमध्ये मोबाईल खाली पडला की नाही, हे स्पष्ट दिसत नसले तरी हा प्रकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
जसप्रीत बुमराहचे हे किती अहंकारी वर्तन आहे. प्रथम त्याने आपल्या चाहत्याला फोन फेकून देईन अशी धमकी दिली आणि नंतर त्याने चाहत्याचा फोन हिसकावून घेतला. pic.twitter.com/O2e4jSLw7s
— (@Goatlified) १७ डिसेंबर २०२५
सोशल मीडियावर मिक्स प्रतिक्रिया
या घटनेनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण बुमराहच्या वागण्याचे समर्थन करत “सेलिब्रिटींची खासगी जागा जपली पाहिजे” असे म्हणत आहेत, तर काही जण त्याच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.






























