हाँगकाँग आग: हाँगकाँगच्या ताई पो भागात बुधवारी लागलेल्या जबरदस्त आगीत मोठ्या निवासी संकुलाला काही तासांतच लपटांनी वेढले. वांग फुक कोर्ट या हाऊसिंग कॉम्प्लेक्समधील टॉवर्समध्ये लागलेल्या आगीने संपूर्ण शहर स्तब्ध केले असून, आतापर्यंत 44 नागरिकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आहे. गंभीर बाब म्हणजे 279 जण अद्यापही बेपत्ता आहेत, त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. वांग फुक कोर्ट हे 8 टॉवर ब्लॉक्सचे मोठे निवासी संकुल असून, तेथे 4 हजारहून अधिक नागरिक राहतात. यामध्ये मोठी लोकसंख्या 65 वर्षांवरील वयोवृद्धांची आहे. आग लागलेल्या परिसरात गोंधळ, धुराचे लोट आणि इमारतींमध्ये अडकलेल्या रहिवाशांचा आक्रोश असे भीषण चित्र बुधवारी पाहायला मिळाले.
बांबूच्या स्कॅफोल्डिंगमुळे आग वेगाने पसरली
दुपारी साधारण 3 वाजता फायर विभागाला आगीचा पहिला कॉल प्राप्त आला. ही आग वांग चेओंग हाउस या 32 मजली इमारतीत सुरू झाली होती, जिथे मागील काही आठवड्यांपासून दुरुस्तीचे काम चालू होते. संपूर्ण इमारत बांबू स्कॅफोल्डिंगने झाकलेली असल्याने आग लवकर इतर मजल्यांवर आणि शेजारच्या टॉवर्सपर्यंत पोहोचली. काही मिनिटांतच बांबूचे जळते ढांचे खाली कोसळू लागले आणि आग दुसऱ्या टॉवर्समध्ये पसरत गेली. 8 पैकी तब्बल 7 टॉवर्स आगीच्या विळख्यात सापडले.
बचाव यंत्रणा तोकडी पडली
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचाव पथके तैनात करण्यात आली. यात 128 फायर ट्रक्स, 57 अँम्ब्युलन्स आणि जवळपास 888 बचाव कर्मचाऱ्यांचा समावेश होता. 32 मजली इमारतीच्या उंच मजल्यांपर्यंत पोहोचणे रेस्क्यू टीमसाठी मोठे आव्हान ठरले. इमारतीच्या आत तापमान इतके प्रचंड होते की बचाव कर्मचाऱ्यांना अनेक वेळा माघार घ्यावी लागली. रहिवाशांना दारे–खिडक्या घट्ट बंद ठेवून ओल्या कापडांद्वारे सीलिंग करण्यास सांगण्यात आले, जेणेकरून धूर आत येणार नाही.
शी जिनपिंग यांच्याकडून दुःख व्यक्त
चीनचे राष्ट्राध्यक्ष, शी जिनपिंग यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करत पीडित कुटुंबीयांप्रती संवेदना जाहीर केल्या. तसेच त्यांनी हाँगकाँग प्रशासनाला मदतकार्याला प्राधान्य देण्याचे आदेशही दिले.
हाँगकाँगचे प्रमुख प्रशासकीय प्रमुख, जॉन ली यांनी या घटनेचा उल्लेख ‘शहरातील मोठी शोकांतिका’ असा केला, तसेच संपूर्ण सरकारी यंत्रणा बचाव कार्यात गुंतली असल्याचेही सांगितले.
आग आणि बेपत्ता प्रकरणात मोठी कारवाई
गुरुवारी पहाटेपर्यंत 3 इमारतींमधील आग नियंत्रणात आणण्यात यश मिळाले. मात्र उर्वरित 4 टॉवर्समध्ये अजूनही धूर आणि हलक्या लपटांचे दृश्य दिसून येत होते. याच दरम्यान, हाँगकाँग पोलिसांनी आग लागलेल्या संकुलातील बांधकाम कामाशी संबंधित असलेल्या एका कंपनीच्या दोन डायरेक्टर्स आणि एका सल्लागाराला ‘गंभीर निष्काळजीपणा’च्या आरोपाखाली अटक केली आहे.
प्रसंगात फायर फायटरचाही दुर्दैवी मृत्यू
आगीवर नियंत्रण मिळवताना बचाव पथकातील एका 37 वर्षीय फायर फायटरचा मृत्यू झाला आहे. आग विझवण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला. याशिवाय 2 अन्य फायर फायटर्स जखमी झाले असून, 30 हून अधिक नागरिक वेगवेगळ्या जखमा आणि धुराच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल आहेत.
हाँगकाँग हे जगभरात बांधकाम सुरक्षेचे उत्कृष्ट मॉडेल म्हणून ओळखले जाते. या शहरात अशा मोठ्या दुर्घटना क्वचितच घडतात, म्हणूनच या आगीच्या घटनेने जागतिक स्तरावरही लक्ष वेधले आहे. बांधकामादरम्यान वापरल्या जाणाऱ्या बांबू स्कॅफोल्डिंगमुळे यावेळी आग पसरायला अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे प्राथमिक विश्लेषण समोर येत आहे.





















