तेजस फायटर जेटची किंमत: शुक्रवारी म्हणजेच 21 नोव्हेंबर रोजी दुबई एअर शोदरम्यान (Dubai Airshow 2025) दरम्यान भारताच्या स्वदेशी बनावटीचं फायटर जेट तेजसचा अपघात झाला. हा अपघात दुबईतील अल मकतूम इंटरनेशनल एअरपोर्टवर (Al Maktoum International Airport) दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी (स्थानिक वेळेनुसार) झाला. भारतीय हवाई दलाच्या (IAF) एका तेजस विमानाने प्रदर्शनीय उड्डाण करत असताना नियंत्रण गमावलं आणि ते थेट जमिनीवर कोसळलं. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला आहे. ही घटना एअर शोच्या शेवटच्या दिवशी घडली. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थित हा अपघात घडल्याने एकच खळबळ उडाली. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
मात्र तेजस हे भारतीय हवाई दलाचं सर्वात आधुनिक विमानांपैकी एक असल्याने या अपघाताचं गांभीर्य अधिक वाढलं आहे. असं असतानाच अपघातानंतर तेजस विमानांची किंमत आणि भविष्यात या विमानांच्या पुढील अवृत्त्या विकसित करण्यासंदर्भातील विषयांवरुन चर्चा रंगू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर एक तेजस विमान नेमकं किती रुपयांना असतं हे जाणून घेऊयात…
कोणती कंपनी बनवते ही विमानं?
तेजस विमानं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कंपनीची निर्मिती आहेत. तेजस Mk-1A ही त्याची सुधारित आवृत्ती आहे. या विमानांची किंमत कॉन्फिगरेशननुसार ठरते. यामध्ये कोणती शस्त्रास्त्रे, इंजिन, रडार आहेत त्यानुसार किंमत निश्चित होते. संख्येनुसार खरेदीची किंमत बदलते, असं साधारणपणे म्हणता येईल. सध्याच्या म्हणजेच 2025 अधिकृत आकडेवारीनुसार एका तेजस विमानाची किंमत किती आहे ते पाहूयात…
एका तेजस विमानाची किंमत किती?
2021 च्या करारानुसार सरकारने 83 एमके-1ए प्रकारची 83 तेजस विमानं घेतली होती. या विमानांची एकूण किंमत होती 48 हजार कोटी रुपये. म्हणजेच एका विमानाची किंमत साधारणपणे 580 कोटी रुपये इतकी होते. आकड्यात सांगायचं झालं तर हे एक विमान 5800000000 रुपयांना आहे.
दुसऱ्या खेपेस किंमत वाढली
2025 ला सरकारने पुन्हा एकदा याच मॉडेलच्या विमानांची दुसऱ्यांदा नव्याने खरेदी केली. यावेळी एमके-1ए प्रकारची 97 विमानं विकत घेण्यात आली आणि यासाठी 66 हजार 500 कोटी रुपये खर्च झाले. म्हणजेच एका विमानासाठी साधारणपणे 640 ते 685 कोटी रुपये मोजावे लागले. आकड्यांमध्ये बोलायचं झालं तर 2025 ला एका तेजस विमानासाठी 6400000000 ते 6850000000 रुपये खर्च करण्यात आले.
साधारणपणे तेजस विमानांबद्दल बोलायचं झाल्यास 400 कोटींपासून या विमानांचं बेसिक मॉडेल उपलब्ध होतं. काही स्रोतांनुसार एमके-1 ची किंमत 420 कोटींच्या आसपास आहे. पण भारतीय हवाई दलाच्या (IAF) मोठ्या खरेदीत ही किंमत कमी होते. उपकरणे आणि देखभाल याचा समावेश करारात केला जात असल्याने किंमत कमी होते.
पुढील अवृत्तीसाठी किती खर्च अपेक्षित?
एमके-2 अवृत्तीच्या विकासासाठी 10 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र या विमानांची प्रति विमान किंमत किती असेल हे अद्याप समोर आलेलं नाही. या विमानांचं उड्डाण 2026 मध्ये अपेक्षित आहे.





















