Eknath Shinde Meets Amit Shah: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये तब्बल 45 मिनिटं चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेत राज्यातील राजकीय घटनाक्रमावर चर्चा केली. विशेषतः त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर आपली नाराजीही बोलून दाखवली आहे.
एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची साधारणपणे पाऊण तास बैठक सुरु होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी काही नेते वैयक्तिक स्वार्थापोटी काम करत आहेत, त्यांच्याकडून अशा पद्धतीने काम यापुढे होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे असा सल्ला दिला. तसंच युतीतल्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळली पाहिजे असं मतही मांडलं आहे.
विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. मात्र काही नेते ते वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळत आहे. मीडियात नाहक उलटसुलट बातम्या येत आहेत. त्यामुळे जनमानसात उगाचच संभ्रम निर्माण होत आहे. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे. युतीच्या विजयी घोडदौडीत त्यामुळे विनाकारण अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.
काही नेते वैयक्तिक स्वार्थापोटी काम करत आहेत त्यांच्याकडून अशा पद्धतीने काम यापुढे होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे .तसेच युतीतल्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळली पाहिजे. भाष्य करताना प्रत्येकाने संयमाची आणि सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे असंही मत त्यांनी मांडलं आहे.
अंतर्गत प्रवेश टाळण्यावर एकमत
एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अंतर्गत प्रवेश टाळण्यावर माझ्यात आणि मुख्यमंत्र्यांमध्ये एकमत झालं असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्रीही आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना कडक सूचना देतील आणि महायुतील कुठेही मिठाचा खडा पडणार नाही, गालबोट लागणार नाही आणि मतभेद होणार नाही असा विश्वास व्यक्त केला आहे.
“मतभेद होता कामा नये, महायुतीला कुठेही गालबोट लागता कामा नये. महायुतीने लोकसभा, विधानसभा लढलो. महायुती म्हणून एकत्र लढत आपण ऐतिहासिक विजय मिळवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वातावरण बिघडू नये, खराब होऊ नये अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री आणि माझी आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
पुढे त्यांनी सांगितलं की, “मुख्यमंत्र्यांनीही आता भाजपा-शिवसेना, शिवसेना-भाजपा किंवा महायुती असे जे अंतर्गत प्रवेश आहेत हे कोणत्याही परिस्थितीत घेतले जाऊ नयेत असं सांगितलं आहे. प्रत्येकाने पक्षाच्या आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे, मीदेखील आमच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्रीही आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना कडक सूचना देतील आणि महायुतील कुठेही मिठाचा खडा पडणार नाही, गालबोट लागणार नाही आणि मतभेद होणार नाही याची काळजी घेतील”.





















