दिल्ली लाल किल्ला Hyundai i20 कार स्फोट धक्कादायक तपशील: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या कारमधील स्फोटाच्या तपासात सुरक्षा यंत्रणांच्या हाती एक धक्कादायक गोष्ट लागली आहे. सुरक्षा यंत्रणांमधील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जणांनी प्राण गमावलेल्या दिल्लीतील या स्फोटात जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मदने ‘शू बॉम्ब’ वापरल्याचे पुरावे सापडले आहेत. मागील आठवडाभरापासून सुरु असलेल्या तपासात उमर हा ‘शू बॉम्बर’ असल्याचं सूचित करणारे अनेक पुरावे हाती लागले आहेत.
बूटामुळे गमावले प्राण
ज्या ठिकाणी हा स्फोट झाला तेथून तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलेल्या आणि डॉक्टर उमर मोहम्मदने आत्मघातकी पद्धतीने उडवून दिलेल्या आय-20 कारच्या सांगड्यामध्ये हादरवून सोडणाऱ्या काही गोष्टी आढळल्याचं ‘न्यूज18 इंडिया’ने म्हटलं आहे. ड्रायव्हरच्या सीटखाली, उजव्या पुढच्या टायरजवळ तपास यंत्रणांना एक बूट सापडला आहे. तपासादरम्यान या बुटात धातूसारखा स्फोटक पदार्थ आढळला असून हाच पदार्थ सदर स्फोट घडवून आणण्यासाठी वापरला गेला होता. आतापर्यंतच्या तपासातून हेच अधोरेखित करणारे अनेक पुरावे समोर आलेत, असं सूत्रांचं म्हणणं आहे. म्हणजेच या बुटाच्या माध्यमातून घडवलेल्या स्फोटात 9 जणांनी आपले प्राण गमावले असून 30 हून अधिकजण जखमी झालेत.
‘TATP’ कनेक्शन
तपास पथकाला टायर आणि बुटात ‘टीएटीपी’चे (TATP) अंश आढळून आलेत. ‘टीएटीपी’ किंवा ट्रायएसीटोन ट्रायपेरोक्साइड हा जगभरातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये वापरला जाणारा धोकादायक घटक आहे. त्याला ‘डेव्हिल्स मदर’ म्हणूनही ओळखले जाते. सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी मोठ्या हल्ल्यासाठी मोठ्या प्रमाणात ‘टीएटीपी’ गोळा करत होते. या दाव्याला आता पुराव्यांच्या आधारे बळ मिळत आहे.
कारमध्ये अनेक ठिकाणी लपवलेली स्फोटके
फॉरेन्सिक टीमच्या अहवालांनुसार, लाल किल्ल्यावरील स्फोटात अमोनियम नायट्रेटसह ‘टीएटीपी’ स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. या दोन्ही रसायनांचे मिश्रण स्फोटाची क्षमता अनेक पटींनी वाढवते, असं सांगितलं जातं. तपास यंत्रणांना गाडीच्या मागील सीटखाली स्फोटक पदार्थांचे अंशही आढळले आहेत. यावरून स्पष्ट होते की स्फोटके एकाच ठिकाणी नव्हे तर कारच्या अनेक भागांमध्ये लपवण्यात आली होती.
20 लाख कुठून मिळाले?
तपासात असंही समोर आलं आहे की स्फोटाच्या कटासाठी 20 लाख रुपयांचं आर्थिक पाठबळ अटक केलेल्या लेडी डॉक्टर शाहीनच्या माध्यमातून मिळालं होतं. दहशतवादी मॉड्यूलला शाहीननेच हे 20 लाख रुपये पोहोचवले होते.
विमानातील बॉम्बस्फोट टळला
डिसेंबर 2001 मध्ये अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात डॉक्टर उमर मोहम्मदने वापरलेल्या स्फोट घडवण्याच्या पद्धतीचाच वापर केला होता. त्यावेळी रिचर्ड रीड नावाच्या ‘शू बॉम्बर’ने ‘टीएटीपी’ भरलेला शूज वापरून बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो वेळीच पकडला गेला अन् विमानात होणारा हा बॉम्बस्फोट टळला होता. उमर मोहम्मदनेही शू बॉम्बर वापरून असाच बॉम्बस्फोट घडवल्याचं सांगितलं जात आहे.





















