दिल्ली लाल किल्ल्यातील स्फोट कोण आहेत डॉ उमर नबी: सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाने देशभरात खळबळ उडाली आहे. संथ गतीने धावत असलेल्या हुंडई आय-20 कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात नऊ जण ठार झाले असून 20 हून अधिक जण जखमी झालेत. तपास यंत्रणांनी आतापर्यंत त्यांच्या तपासात उघड केलेल्या माहितीनुसार हा हल्ला फरिदाबादमधील कट्टरपंथी नेटवर्क असलेल्या फरिदाबाद मॉड्यूलशी संबंधित असल्याचं सूचित केले जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक पुराव्यांवरून फरिदाबाद येथील डॉ. उमर उ नबीनेच हा आत्मघाती हल्ला घडवून आणल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. डॉ. उमर उ नबीनेच स्वत: बॉम्बर होऊन हा हल्ला केला. ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथे सापडलेला एक कापलेला हात डॉ. उमरचा असल्याचे मानले जात आहे. डीएनए चाचणीसाठी काश्मीरमधील त्यांच्या कुटुंबाकडून नमुने गोळा केले जात आहेत.
नऊ जणांचा मृत्यू
सोमवारी संध्याकाळी गर्दीच्या वेळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ हा हल्ला झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असे दिसून येते की कारमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके भरलेली होती. हा स्फोट कदाचित आत्मघातक बॉम्बर म्हणून ड्रायव्हरने घडवून आणली असावी. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे कारचे तुकडे झाले आणि जवळपासची चार वाहने जळून खाक झाली. बॉम्बस्फोटानंतर दिल्ली पोलिस आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी दाखल झाली. या स्फोटात मृतांची संख्या नऊ झाली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे, अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे. दिल्ली पोलिसांनी संपूर्ण शहरात हाय अलर्ट जारी केला आहे, तर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हल्लेखोराची ओळख पटली आहे.
उमरची गुन्हेगारी कुंडली
डॉ. उमर यू नबी हाच संशयित हल्लेखोर असल्याचं तपास यंत्रणांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. डॉ. उमर यू नबी मूळचा जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथील आहे. 24 फेब्रुवारी 1989 रोजी जन्मलेले उमरचे वडील गुलाम नबी भट हे सरकारी शिक्षक होते आणि त्यांनी 10 ते 15 वर्षांपूर्वी मानसिक आजारामुळे नोकरी सोडली होती. उमरची आई शमीमा बानो पुलवामा येथील कोयल येथील आहे. डॉ. उमर यू नबीच्या कुटुंबात दोन भाऊ आणि एक मोठी बहीण आहे. एक भाऊ आणि बहीण विवाहित आहेत, तर दुसरा अविवाहित आहे. पोलिसांनी उमरचे दोन्ही भाऊ आणि आई यांना ताब्यात घेतले आहे.
प्राध्यापकपदी कार्यरत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमरने श्रीनगरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून औषधशास्त्रात एमडी पदवी मिळवली. त्यानंतर तो जीएमसी अनंतनाग येथे वरिष्ठ निवासी म्हणून काम करत होता आणि नंतर दिल्लीला गेला. तो सध्या फरिदाबादमधील अल-फलाह वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतो. एका वरिष्ठ तपास अधिकाऱ्याने फरिदाबाद आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या कारवाईनंतर उमर घाबरला. तो पळून गेला आणि अचानक त्याच्याकडे असलेल्या स्फोटकांचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने घाईघाईत हा हल्ला घडवून आणल्याचा दावा केला जातोय.
तो हात उमरचाच?
सीसीटीव्ही फुटेजमध्ये निळ्या शर्ट घातलेल्या एका व्यक्ती दिसत आहे तो उमर असल्याचे मानले जात आहे. तो एका कारजवळ दिसत आहे. हे व्हिडीओ स्फोटापूर्वीचे असल्याचे सांगितले जात आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरुन सापडलेला एक कापलेला हात कार चालकाचा असल्याचे ओळखले आहे, जो उमरचा असू शकतो. त्याची ओळख पटविण्यासाठी काश्मीरमधील त्याच्या कुटुंबाकडून डीएनए नमुने गोळा केले जात आहेत. हा शोध दिल्ली-एनसीआर आणि जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या तपासाचा एक भाग आहे.
‘फरिदाबाद मॉड्यूल’
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर हा वैद्यकीय व्यावसायिकांच्या गटाचा भाग होता ज्यांना एन्क्रिप्टेड टेलिग्राम चॅनेलद्वारे कट्टरपंथी बनवण्यात आले होते. उमरचा जवळचा सहकारी डॉ. आदिलचे नावही या ‘फरिदाबाद मॉड्यूल’मध्ये प्रमुखपणे दिसत आहे. आदिलचीही चौकशी सुरू आहे. मॉड्यूल सदस्यांनी वैद्यकीय व्यवसायाच्या नावाखाली दहशतवादी कारवाया केल्या, ज्यामध्ये स्फोटके मिळवणे आणि नेटवर्क तयार करणे या सारख्या गोष्टींमध्ये ते सहभागी होते. फरिदाबाद पोलिसांनी अलीकडेच या मॉड्यूलवर छापा टाकला, त्यानंतर उमर पळून गेला.





















