सोलापूर क्राइम न्यूज: राज्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुले वातावरण तापलं असताना सोलापुरात अजून एका सुनेने आपलं आयुष्य संपवलं आहे. 22 वर्षीय आशाराणी भोसले या 3 महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटीमधील या धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. चारचाकी आणि पैशांच्या हव्यासाठी सुनेचा छळ करण्यात येत असल्याचा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी केला आहे. एवढंच नाही, तर माझ्या लेकीने आत्महत्या नाही तर तिची हत्या केल्याचा आरोप आशाराणीच्या वडिलांनी केला आहे. पोलिसांनी पतीसह सासू – सासरे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
पळून जाऊन लग्न, पहिली मुलगी झाली म्हणून…
कुटुंबियांनी सांगितलं की, 2019 मध्ये उशाराणी हिच लग्न ज्ञानेश्वर भोसले यांच्याशी झाला. त्यानंतर उशाराणी यांची लहान बहीण आशाराणी हिने ज्ञानेश्वर यांच्या लहान भाऊ पवन भोसलेसोबत पळून जाऊन लग्न केलं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर पहिली मुलगी झाल्यानंतर आशाराणीचा सासरच्या मंडळीकडून छळ सुरु झाला. अनेक वेळा आशाराणीच्या कुटुंबियांना व्हिडीओ कॉल केला जायचा आणि मग तिला मारहाण केली जायची. एकदा तर आशाराणी माहेरी निघून आली आणि पोलिसात तक्रारही केली होती. पोलिसांनी समजून सांगितल्यावर ती पुन्हा सासरी नांदायला गेली.
आशाराणीच्या पहिला मुलीचं नाव वैष्णवी असून तिच्या जन्मानंतर आशाराणीला चारचाकी, खर्चासाठी पैशांसाठी सतत छळ करण्यात येत होता. मागील तीन वर्षांपासून आशाराणी हिला नवरा पवन हा चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणि खर्चासासाठी माहेरहुन पैसे आण म्हणून मारहाण करतं होता.
तर सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले हे देखील मुलीला स्वयंपाक नीट करता येतं नाही, मुलाला इज्जत देतं नाही असे म्हणत मानसिक छळ करतं होते. 2024 मध्ये देखील पती पवन याने आशाराणी भोसले हिला मारहाण करून माहेरी पाठवलं होतं. त्यावेळी महिला तक्रार निवारण केंद्राच्या मदतीने पती पत्नीचे समुपदेशन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर देखील पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले यांच्याकडून त्रास देने सुरूच होते.
त्यामुळेच तीन महिने गर्भवती आशाराणी भोसले हिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची फिर्याद आशाराणीचे वडील नागराज डोणे यांनी दिली. त्यांच्या फिर्यादीवरून मृत आशाराणीचे पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.





























