ऑपरेशन सिंदूर: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने बदला घेतला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हवाई हल्ल्याद्वारे पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर सिंदूर या नावाची खूप चर्चा होतेय. ‘एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो?’ हा डायलॉग देशभरात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा डायलॉग सध्या अनेकांच्या स्टेटसला दिसतोय. पण हा डायलॉग कोणत्या सिनेमातील आहे? तो कोणी लिहिलाय? यामागची कहाणी जाणून घेऊया.
तुम्ही बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा प्रसिद्ध चित्रपट ‘ओम शांती’ पाहिला असेल. या चित्रपटात’एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो रमेश बाबू’ हा प्रसिद्ध डायलॉग आहे. हा चित्रपट रेड चिलीज एंटरटेनमेंट बॅनरखाली बनवण्यात आला होता. त्याची निर्मिती गौरी खानने केली होती. हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत होते आणि अर्जुन रामपाल खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आणि त्याचे संवाद अजूनही लोकांच्या ओठांवर आहेत. ‘एक चुटकी सिंदूर’ हा संवाद अभिनेत्री दीपिका पदुकोणवर चित्रित करण्यात आला होता. या चित्रपटाची कथा पुनर्जन्मावर आधारित आहे.
या चित्रपटात जेव्हा दीपिका तिच्या मांगात सिंदूर भरत असल्याचा अभिनय करत असते, तेव्हा पार्श्वभूमीवर एक संवाद ऐकू येतो. ज्यामध्ये म्हटलंय की, ‘एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो रमेश बाबू’ भगवान का आशीर्वाद है एक चुटकी सिंदूर, सुहागनके सर का ताज हे एक चुटकी सिंदूर’. या चित्रपटाचा संवाद मयूर पुरी यांनी लिहिलाय. त्यांनी लिहिलेला हा संवाद अजूनही लोकांच्या ओठांवर आहे. आता भारताने या ऑपरेशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले. ज्यामुळे हा संवाद पुन्हा एकदा ताजा झाला.
‘सिंदूर’ नावावरुन राज ठाकरेंचा थेट PM मोदींवर निशाणा!
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरुद्धच्या भारताच्या मोहिमेला दिलेलं ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव सुद्धा पंतप्रधान मोदींनीच दिलं आहे. पहलगाममध्ये अनेक भारतीय महिलांच्या भांगेतील कुंकू दहशतवाद्यांनी पुसल्याने दहशतवाद्यांविरोधातील या मोहिमेला मोदींनी हे विशेष नाव दिलं. मात्र या नावावरुनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी 22 एप्रिल ते 7 मे दरम्यान हजेरी लावलेल्या कार्यक्रमांचा पाढाही राज यांनी वाचून दाखवला. ऑपरेशन सिंदूर नाव दिलं आहे, असं म्हणत राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राज ठाकरेंनी, “नावंबिवं देऊन भावनिक होण्याचा आणि याचा इथे काही विषय नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही नक्की काय करताय? इतक्या दिवस जे काही कार्यक्रम झाले त्याची काही आवश्यकता नव्हती,” असंही राज ठाकरे म्हणाले.






























