शहरातील मुख्य रस्त्यासह सर्व्हिस रोडवर दुकान, हॉटेल, टपऱ्या, हातगाड्या चालकांनी पक्के अतिक्रमण केले आहे. बीड बायपासच्या सर्व्हिस रोडवर अतिक्रमण केल्याने वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे मनपाने अतिक्रमणधारकांना १५ दिवसांपूर्वी नोटीस बज
?
थेट सवाल संतोष वाहुळे, मनपा अतिक्रमण विभागप्रमुख
प्रश्न : अतिक्रमण काढण्यासाठी वेळ का देत नाही ? उत्तर : आम्ही १५ दिवसांपूर्वीच नोटीस देऊन अतिक्रमण काढण्याची विनंती केली आहे. नुकसान टाळण्यासाठी स्वतः अतिक्रमण काढून घ्यावे. कारवाईदरम्यान कुणाचीही गय केली जाणार नाही. प्रश्न : अतिक्रमण पुन्हा होऊ नये म्हणून काय करणार? उत्तर : अतिक्रमण होऊ नये यासाठी सातत्याने कारवाई सुरू ठेवणार आहोत. प्रश्न : पुढची कारवाई कुठे करणार? उत्तर : सातारा, देवळाई, बीड बायपास आणि पैठण रोड या भागात पुढील आठवडाभर सातत्याने कारवाई करणार आहोत. बीड बायपास रोडवर देवळाई चौकातील अतिक्रमणांवर महापालिकेने मंगळवारी बुलडोझर चालवला.
शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळून देवळाई चौक यादरम्यान असलेली अतिक्रमणे काढण्यास मनपाने सकाळी ९ वाजता सुरुवात केली. कारवाईदरम्यान अतिक्रमणधारकांसह, स्थानिक भूमाफियांनी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो झुगारून मालमत्तांची मोजणी करत मनपाच्या पथकाने कारवाई सुरूच ठेवली. पुढील आठवडाभर ही कारवाई सुरू राहणार आहे. या कारवाईमुळे सातारा, देवळाई, बीड बायपास आणि पैठण रोडवरील सर्व्हिस रोडचा श्वास मोकळा करणार असल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बांधकाम साहित्य विक्रेत्यांना दंड
सातारा, देवळाई, बीड बायपास रस्त्यावर विटा, वाळू, खडी आदी बांधकाम साहित्य रस्त्यावर मांडले होते. त्यांना मनपाने १ लाख ३५ हजारांचा दंड ठोठावला. यासोबतच तत्काळ हे अतिक्रमणदेखील काढून घेण्याचे निर्देश दिले.
सर्व्हिस रोडची चर्चा
बीड बायपास हा मुख्य रस्ता चौपदरी आहे. त्यालगतच दोन्ही बाजूंना एकपदरी रस्ता केलेला आहे. मात्र, त्यानंतरही बीड बायपास रोडवरील गर्दी कमी झालेली नाही. मुख्य रस्त्यालगत सर्व्हिस रोड करण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. त्या दृष्टीने नियोजनही केले होते. सर्व्हिस रोड गृहीत धरून बांधकामे मुख्य रस्त्यापासून ४० ते ४५ फुटांपर्यंत मागे आहेत. मात्र मुख्य मार्गालगत दोन्ही बाजूंनी एकपदरी रस्ता केल्यामुळे परिणामी अनेक दुकानदारांनी एकपदरी रस्त्यापर्यंत अतिक्रमणे केली होती. आता ही अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू झाल्याने सर्व्हिस रोड होईल, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
पत्र देऊनही पोलिस बंदोबस्त नाही
मनपा अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे, अतिक्रमण विभागाच्या सहायक आयुक्त सविता सोनवणे, वॉर्ड अधिकारी भारत बिरारे, अर्जुन गिराम, राहुल जाधव आदींसह अतिक्रमण विभागाचे २५ कर्मचारी आणि नागरी मित्र पथकातील ४० सेवानिवृत्त जवान यांनी ही कारवाई केली. यासाठी ४ जेसीबी, ३ टिप्पर, हायड्रॉलिक मशीन आदींचा वापर करण्यात आला. पोलिस बंदोबस्तासाठी पत्र दिले होते, मात्र मनपाला पोलिस बंदोबस्त मिळाला नाही. त्यामुळे मनपाच्या पथकालाच संतापाचा सामना करावा लागला.





























