मेळाव्यात गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मदतीचा धनादेश
पुणे : भारती विद्यापीठाच्या कोथरूड शैक्षणिक संकुलातील भारती विद्यापीठ पूना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, प्राचार्य डॉ. आत्माराम पवार, ॲल्युमिनाय असोशीएशनचे अध्यक्ष श्रीधर जोशी, उपप्राचार्या डॉ. वर्षा पोखरकर, डॉ. सत्यनारायणन, सचिव डॉ. शर्विल पाटील उपस्थित होते. या स्नेह मेळाव्यासाठी देश विदेशातून माजी विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित राहिले होते.
भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांच्या नेतृत्वाखाली १९८१ साली पूना कॉलेज ऑफ फार्मनीची स्थापना झाली. तेव्हापासून महाविद्यालयाच्या यशाचा आलेख सतत उंचावत राहिला आहे. या वर्षी NIRF कडून महाविद्यालयास ३४ या क्रमांक प्राप्त झाला असून एन.बी.ए व नॅक कडून A++ दर्जा मिळाला आहे. तसेच १८०० शोध निबंध प्रसिध्द झाले असून व २१ पेटेन्ट मंजूर झालेली आहेत. महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी नामांकित औषध कंपन्यामध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
यावेळी निवृत शिक्षक डॉ. अजित पुरोहित व डॉ. किशोर गुजर यांचा पीसीपी गुरु म्हणून तर महाविद्यालयाचे प्रथम प्रबंधक वसंतराव माने यांचा सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
माजी विद्यार्थ्यांकडून गुणवंत विद्यार्थी व आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी २,२४,६१२/-रुपयांचा धनादेश महाविद्यालयाकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थ्यांना स्मृती चिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले.
संयोजक डॉ. दिपाली बनसोडे व डॉ. वैभव शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर खजिनदार डॉ. प्रविण जावळे यांनी आभार मानले.


























