जल जीवन मिशनची कामे पूर्ण होऊन देखील नागरीकांना पाणी का मिळत नाही, अर्धवट योजना पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांची तातडीने बैठक घेऊन अपूर्ण कामे पूर्ण करावीत अन्यथा दोषींवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी
?
येथील जिल्हा परिषदेच्या नक्षत्र सभागृहात शुक्रवारी सीईओ अंजली रमेश यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात बैठक झाली. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंके, पाणी व स्वच्छता मिशन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, माधव कोकाटे, अभियंता संदेश जाधव, अग्रवाल यांच्यासह विज कंपनीचे अभियंता उपस्थित होते.
यावेळी सीईओ अंजली रमेश यांनी गावनिहाय पाणी योजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यात २०१ गावांमध्ये योजना पूर्ण असतानाही काही ठिकाणी पिण्यासाठी पाणी का मिळत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्या ठिकाणी विज जोडणीची अडचण असेल त्या ठिकाणी तातडीने विज जोडणी घेऊन गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे. तसेच १६८ योजना किरकोळ कामे केल्यानंतर पूर्ण होऊ शकतात. त्यासाठी कंत्राटादारांची बैठक घेऊन त्यांना तातडीने कामे पूर्ण करण्याबाबत सुचना देऊन त्यांच्याकडून कामे पूर्ण करून घ्यावीत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावकऱ्यांची पाण्यासाठी हेळसांड होता कामा नये. यासाठी पाणी पुरवठा विभागाने नियोजन करावे. पाचही तालुक्यांमधून योजनांचे पाणी गावकऱ्यांना मिळाले पाहिजे याची खबरदारी उपविभागीय अभियंत्यांनी घ्यावी. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच विज कंपनीने १६४ गावांमध्ये विज पुरवठा देण्यासाठी तातडीने अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या

































