- मराठी बातम्या
- राष्ट्रीय
- पेपरफुटीवरून संसद तिसऱ्या दिवशीही ठप्प; प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आग्रही आहेत
नवी दिल्ली14 मिनिटांपूर्वी
- लिंक कॉपी करा
पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईवरून संसदेतील पेच बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुटू शकला नाही. लोकसभा व राज्यसभेत सरकारने सांगितले की ते नीटवर चर्चेसाठी तयार आहेत. परंतु विरोधी पक्ष शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर व राज्यसभेत नियम २६७ अंतर्गत चर्चेच्या मागणीवर ठाम राहिले. शेवटी दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करावे लागले.
लोकसभेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, विरोधक नवीन अटी घालून चर्चा होऊ देत नाहीत. राज्यसभेत सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी विरोधकांवर संसदेची प्रतिष्ठा व लोकशाही मूल्यांचे नुकसान केल्याचा आरोप केला. विरोधकांनी सरकारवर जबाबदारी टाळण्याचा आरोप केला. काँग्रेस अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोवर नीटवर कोणतीही चर्चा होणार नाही. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, सरकार चर्चेसाठी तयार आहे आणि सर्व पक्षांच्या गटनेत्यांशी बैठक घेऊन चर्चेचे नियम, तारीख ठरवू.
सलमान, अरिजित, नसीरुद्दीन शहांसह अनेकांचा पाठिंबा
अभिनेता सलमान खानने आंदोलनाला पाठिंबा देत प्रश्नपत्रिका फुटीचा प्रकार गंभीर आहे,आंदोलनाने हिंसक वळण घेणे दुर्दैवी आहे, असे म्हटले आहे. नसीरुद्दीन शहा, अरिजित सिंह, राजकुमार राव, स्वरा भास्कर, प्रीती झिंटा,अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला.
अखिलेश यांनी विचारले- सरकारशी करार झाला का?
लोकसभेत सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी नाराजी व्यक्त केली की भाजप व काँग्रेसच्या नेत्यांना बोलू दिले गेले. पण त्यांना नाही. नंतर त्यांनी प्रश्न उपस्थित केला की सरकार व काँग्रेस यांच्यात काही करार झाला आहे का? काँग्रेसने स्पष्टीकरण दिले की विरोधकांची संयुक्त रणनीती शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि नीटवर चर्चेच्या मागणीबाबत आहे.
सपा-काँग्रेसमध्ये तणावही…
आंदोलन राजकारणापासून कसे दूर ठेवता येईल?
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आहे. तरीही जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या मंचावर कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा किंवा नेत्याचे छायाचित्र दिसत नाही. आंदोलनासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे स्वतःला राजकीय पक्षांपासून दूर ठेवणे. सीजेपीच्या एका पदाधिकाऱ्याने मान्य केले की, लहान आणि नव्या संघासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन जाणे आव्हानात्मक ठरत आहे. २० जुलैच्या आंदोलनात जखमी झालेले अनेक विद्यार्थी डोक्यावर पट्ट्या बांधून मंचासमोर बसलेले दिसत होते. दिवसभर घोषणाबाजी सुरू होती. लखनऊची नीट परीक्षार्थी सारगर्भित श्रीवास्तव म्हणाली,”पेपरफुटीने आमचे भविष्य हिरावून घेतले आहे. आता आम्ही मागे हटणार नाही.” बिहारमधील रोहतास येथून आलेला १९ वर्षीय राहुल म्हणाला, ‘लाठीचा मार बसला, पण मनोबल खचलेले नाही.”
तृणमूल खासदार कल्याण बॅनर्जी निलंबित
तृणमूल खासदार कल्याण बॅनर्जी यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित केले आहे. कल्याण यांच्यावर ही कारवाई महिला खासदारांविरुद्ध अभद्र भाषेचा वापर केल्यामुळे करण्यात आली.






























