MI केप टाउन वि प्रिटोरिया कॅपिटल्स SA20: दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीग SA20 मध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. बुधवार (31 डिसेंबर) रात्री वेस्ट इंडीजचा शेरफेन रदरफोर्ड आणि दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेविस यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. दोघांनी मिळून सलग सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकत प्रेक्षकांना थक्क केलं. SA20 स्पर्धेत रदरफोर्ड आणि ब्रेविस यांच्या स्फोटक खेळीमुळे सामना एकतर्फी झाला. आयपीएलमध्ये रदरफोर्ड मुंबई इंडियन्स (MI) तर ब्रेविस चेन्नई सुपर किंग्स (CSK)चा भाग आहे. या दोघांच्या वादळी कामगिरीमुळे सौरव गांगुली प्रशिक्षक असलेल्या प्रिटोरिया कॅपिटल्सला हंगामातील पहिला विजय मिळाला. प्रिटोरियाने एमआय केप टाउनचा 85 धावांनी पराभव केला.
होप आणि लूबेने डाव सावरला
नाणेफेक जिंकून प्रिटोरियाचा कर्णधार केशव महाराजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र संघाची सुरुवात खराब झाली आणि 5.3 षटकांत 38 धावांत 3 विकेट्स पडल्या. येथून शाई होप आणि विहान लूबे यांनी डाव सावरला. दोघांनी संघाला 14.4 षटकांत 126 धावांपर्यंत नेलं. शाई होप 30 चेंडूंमध्ये 45 धावा करून बाद झाला. लूबेने 36 चेंडूंमध्ये 60 धावांची खेळी करत संघाला स्थैर्य दिलं. तो 16व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. 15.3 षटकांत प्रिटोरियाची धावसंख्या 5 विकेट्सवर 134 अशी होती. तेव्हा संघ 180 धावांपर्यंत पोहोचेल असं वाटत होतं, पण पुढे जे घडलं त्याने सगळेच अवाक झाले.
रदरफोर्ड–ब्रेविस नावांचे वादळ
यानंतर रदरफोर्ड आणि ब्रेविसने सूत्रे हाती घेतली. होप आणि लूबेने उभारलेल्या पायााचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. रदरफोर्डने अवघ्या 15 चेंडूंमध्ये नाबाद 47 धावा (6 षटकार) ठोकले. ब्रेविससोबत त्याने 30 चेंडूंमध्ये 86 धावांची भागीदारी केली. ब्रेविसने 13 चेंडूंमध्ये नाबाद 36 धावा केल्या.
या दोघांनी मिळून 18व्या आणि 19व्या षटकात सलग सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकले. 18व्या षटकातील पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर ब्रेविसने कार्बिन बॉशला सलग दोन षटकार मारले. त्यानंतर 19व्या षटकात रदरफोर्ड स्ट्राइकवर आला आणि त्याने ड्वेन प्रिटोरियसच्या पहिल्या चार चेंडूंवर सलग चार षटकार ठोकले. अशा प्रकारे सहा चेंडूंवर सहा षटकारांचा पराक्रम पूर्ण झाला.
गोलंदाजीतही रदरफोर्ड चमकला
रदरफोर्ड इथेच थांबला नाही. या गुयानाचा ऑलराउंडरने गोलंदाजीतही कमाल केली. त्याने 3 षटकांत 24 धावा देत 4 विकेट्स घेतल्या, हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजीचा आकडा आहे. या शानदार कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.
केशव महाराजनेही त्याला उत्तम साथ दिली. महाराजने 4 षटकांत 28 धावा देत 3 विकेट्स घेत सामना संपवला. एमआय केप टाउनचा संघ 14.2 षटकांत 135 धावांवर गारद झाला. त्यांच्याकडून रायन रिकेल्टनने सर्वाधिक 33 धावा केल्या. स्पर्धेतील तीन सामन्यांत एमआय केप टाउनचा हा दुसरा पराभव असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. गुणतालिकेत संघ सध्या सहाव्या आणि शेवटच्या स्थानावर आहे.





























