रकुल प्रीत सिंग: बॉलिवूडमधील अभिनेत्यांचे नाव वारंवर ड्रग्ज प्रकारणी नोंदवले जात आहे. अलीकडेच श्रद्धा कपूरच्या भावाचं नाव या प्रकरणात आलं होतं तर आता सुप्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रित सिंगच्या भावाचं नाव आलं आहे. राकुल प्रित सिंगच्या भावावर म्हणजेच अमन प्रित सिंगवर ड्रग्जच्या तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढेच नाही तर अटकेचं वॉरंटदेखील काढण्यात आलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
अलीकडेच हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत, ज्यामध्ये रकुलचा भाऊ अमन प्रीत सिंगचे नाव समोर येत आहे. तो फरार आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अटकेचं वॉरंट जारी केले आहे. 2024 मध्ये अमनला एका ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती आहे. ‘आज तक’च्या वृत्तानुसार, 19 डिसेंबर रोजी हैदराबादमधील मसाब टँक पोलीस स्टेशनला ड्रग्जच्या व्यवहाराची माहिती मिळाली. तपास केल्यानंतर, पार्कमध्ये एक कार सापडली, ज्यातून 43 ग्रॅमपेक्षा जास्त कोकेन आणि 11 ग्रॅमपेक्षा जास्त एमडीएमए जप्त करण्यात आले.
नायजेरियन डीलरकडून ड्रग्ज मागवले
या प्रकरणात पोलिसांनी मलकपेट येथील रिअल इस्टेट ब्रोकर नितीन सिंघानिया आणि व्यापारी श्रणिक सिंघवी यांना अटक केली. तपासात असे दिसून आले की हे दोघे नायजेरियन डीलरकडून ड्रग्ज मिळवत होते. हे ड्रग्ज आफ्रिकन कुरिअर सेवेद्वारे हैदराबादला पोहोचवले जात होते. आरोपींनी दिलेल्या जबाबांच्या आधारे, 24 डिसेंबर रोजी दोन आफ्रिकन नागरिकांनाही अटक करण्यात आली. यामुळे रकुल प्रीत सिंगचा भाऊ अमन प्रीत सिंग याचे नाव पुढे आले. अमन या आफ्रिकन व्यापाऱ्यांकडून ड्रग्ज खरेदी करत असल्याचे उघड झाले. त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. तो फरार झाल्यानंतर अटक वॉरंट जारी करण्यात आले. त्याचा शोध सुरू आहे.
2024 मध्ये अटक झाली होती
गेल्या वर्षी, सायबराबाद पोलिसांच्या नार्कोटिक्स ब्युरो आणि राजेंद्र नगर स्पेशल टास्क फोर्स (एसओटी) यांच्या संयुक्त कारवाईनंतर हैदराबाद पोलिसांनी अमनला ड्रग्ज प्रकरणात अटक केली. हैदराबादमध्ये एका पत्रकार परिषदेत पोलिसांनी सांगितले की, अलिकडेच झालेल्या ड्रग्ज जप्तीप्रकरणी अमनला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात ड्रग्ज तस्करीसाठी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तथापि, अमनचे नाव ड्रग्ज सेवन केलेल्या आणि पॉझिटिव्ह आलेल्या 13 जणांच्या यादीत समाविष्ट होते. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
अमनप्रीत कोण आहे?
अमनच्या कुटुंबात त्याची आई कुलविंदर सिंग आणि वडील राजेंद्र सिंग (भारतीय सैन्यातून निवृत्त कर्नल) यांचा समावेश आहे. त्याची बहीण अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आहे, जिचे लग्न निर्माता जॅकी भगनानी याच्याशी झाले आहे. अमनचा जन्म 1 एप्रिल 1993 ला झाला. त्याच्या बहिणीप्रमाणेच अमन देखील एक अभिनेता असून तो तेलुगू सिनेसृष्टीत काम करतो.
टॅलेंट प्लॅटफॉर्मची स्थापना
अमनने त्याची बहीण रकुलसोबत मिळून ‘स्टारिंग यू’ या टॅलेंट डिस्कव्हरी प्लॅटफॉर्मची सह-स्थापना केली, जी कलाकारांना निर्माते, कंटेंट मालक आणि वितरकांशी जोडते. 2022 च्या मुलाखतीत, त्याने सांगितले की या प्लॅटफॉर्मद्वारे त्याचे ध्येय राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर उदयोन्मुख कलाकारांसाठी एक-स्टॉप शॉप तयार करणे आहे.































